नोटाबंदीनंतर ५० दिवसांत साईचरणी ३५ कोटी अर्पण

43

साडेचार कोटींच्या जुन्या नोटा, दोन किलो सोने, ५६ किलो चांदीचा समावेश

शिर्डी – नोटाबंदीनंतर ५० दिवसांत साईभक्तांनी ३५ कोटींचे दान साईचरणी अर्पण केले. यामध्ये साडेचार कोटींच्या जुन्या नोटांचा समावेश आहे. तसेच रोख रकमेशिवाय दोन किलो सोने आणि ५६ किलो चांदीही अर्पण केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदी केल्यानंतर देशभर तारांबळ उडाली. संपूर्ण देशात पैशांसाठी गोंधळ उडाला असताना साईंच्या दानपेटीवर मात्र कोणताही परिणाम जाणवला नाही. या काळात भक्तांनी साईचरणी भरभरून दान दिले.
याच काळात साईभक्तांनी बंद केलेल्या २ कोटी ७ लाखांच्या १००० च्या २०,७५९ नोटा, तर २ कोटी ४६ लाखांच्या ५०० च्या ४९,२५३ नोटा दानपेटीत दान केल्या आहेत. नवीन दोन हजारांच्या १६,३३० म्हणजे ३ कोटी २६ लाख, तर नवीन पाचशेच्या १०,८११ म्हणजे ५४ लाख असे एकूण ३ कोटी ८० लाख रुपयांच्या नव्या नोटा अर्पण केल्या आहेत.

या ५० दिवसांत भक्तांनी दान केलेले दोन किलो ९०० गॅ्रम सोने किंमत ७३ लाख, तर ५६ किलो ५०० गॅ्रम चांदी याची किंमत १८ लाख रुपये आहे. त्याचबरोबर डेबिट कार्ड आधारे २ कोटी ६२ लाख, चेक व डीडीद्वारे ३ कोटी ९६ लाख, ऑनलाईन देश-विदेश चलनाद्वारे पाच लाख २५ हजार, तर हिंदुस्थानी चलनात एक कोटी ९६ लाख रुपये जमा झाले. हुंडीद्वारे १८ कोटी ९६ लाख व डोनेशन काऊंटरवर ४ कोटी २५ लाख, ऑनलाईन आरती व दर्शन पास विक्रीतून ३ कोटी १८ लाख रुपये संस्थानच्या तिजोरीत जमा झाले. अन्नदान प्रसादालय काऊंटरवर १६लाख रुपये जमा झाले असून, एकूण ३५ कोटी रोख दान साईचरणी अर्पण केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या