36 कुटुंबांना मिळाल्या चाव्या, तब्बल 15 वर्षांनंतर गृहस्वप्न झाले साकार

तब्बल 15 वर्षांनंतर गोरेगाव येथील अर्चना सोसायटीतील 36 कुटुंबांचे गृहस्वप्न रामनवमी दिवशी साकार झाले. या सोसायटीचा पुनर्विकास प्रकल्प 15 वर्षांपासून होत होता आणि 12 वर्षांपासून थांबला होता.

पुनर्विकासाचे काम 2008 मध्ये सुरू झाले, परंतु विकासकाने ते 2011 मध्ये थांबवले. सदनिकाधारकांना भाडे देणेही थांबवले. त्याचवेळी 2017 मध्ये गोरेगाव येथीलच एकता सुप्रभात हा रखडलेला प्रकल्प न्यायालयाच्या देखरेखीखाली अजय देढीया यांनी पूर्ण केला ही बातमी सदस्यांना मिळाली.

अर्चना सोसायटीच्या सदस्यांनी देढीया यांची भेट घेतली. त्यानंतर खरेदीदारांकडून वाजवी वाढीव रक्कम घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन पुन्हा 2021 मध्ये काम सुरू झाले, अशी माहिती संस्थेचे सचिव रिषभ जैन यांनी दिली. 36 सदनिकाधारकांना रामनवमीच्या दिवशी त्यांच्या रखडलेल्या घराच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.