महाराष्ट्र महिला कबड्डी संघाची दुसरी माळही विजयाची, यजमान गुजरातला चारली धूळ

सुपरस्टार रेडर पूजा यादव आणि मेघा कदमने सुरेख खेळीतून महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचा 36 व्या नॅशनल गेम्समध्ये विजयाचा डबल धमाका उडवला. महाराष्ट्र महिला संघाने मंगळवारी दुसऱया सामन्यात यजमान गुजरातला धूळ चारली. स्नेहलच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने 46-22 ने दणदणीत सामना जिंकला. महाराष्ट्र संघाने सर्वोत्तम खेळीतून गुजरातवर चार लोन मारले. यासह टीमने शेवटच्या मिनिटांपर्यंत सामन्यात आपले वर्चस्व राखून ठेवले.  यासह महाराष्ट्र संघाला सलग दुसऱया सामन्यात धडाकेबाज विजयाची नोंद करता आला. महाराष्ट्राच्या नवदुर्गांनी नवरात्रीच्या दुसऱया माळेला विजय साजरा केला. प्रशिक्षक संजय मोकळ यांच्या अचूक डावपेचातून महाराष्ट्राने एकतर्फी विजय साकारला.

पूजा, मेघाची सर्वोत्तम खेळी

महाराष्ट्र संघाने मंगळवारी गटातील दुसऱया सामन्यासाठी संघात एक बदल केला. बोनसची स्टार सोनाली शिंगटेला विश्रांती देण्यात आली. तिच्या जागी पूजा यादवला संधी देण्यात आली. याच विश्वासाला सार्थकी लावताना पूजा यादवने सुरेख चढाई करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.  अशाच प्रकारची तोडीसतोड खेळी मेघा कदमने केली.

अंकिता, सायलीची अचूक पकड

महाराष्ट्र संघातील गुणवंत खेळाडू अंकिता जगताप आणि सायली जाधवची खेळी लक्षवेधी ठरली. त्यांनी आपल्या अचूक पकडीतून गुजरात टीमच्या रेडरचा गडी मारण्याचा प्रयत्न वेळोवेळी हाणून पाडला. त्यामुळे गुजरात टीमला घरच्या मैदानावर लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. पकडीतून अंकिता आणि सायलीने सामना गाजवला.

महिला व पुरुष संघांची  बाद फेरीकडे आगेकूच

महाराष्ट्राच्या महिला व पुरुष संघानी ‘36व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेतील’ कबड्डी विभागात दुसऱया विजयासह बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. कंकरिया अहमदाबाद येथील ईका इरिना ट्रान्स बंदिस्त क्रीडा संकुलात झालेल्या महिलांच्या ‘अ’ गटातील दुसऱया साखळी सामन्यात महाराष्ट्राने यजमान गुजरातचा 46-22 असा सहज पराभव केला. महाराष्ट्राची पुढील लढत बिहारशी होईल. महाराष्ट्राच्या पुरुष संघानेदेखील ‘अ’ गट साखळीतील दुसऱया सामन्यात चंदिगडचे आव्हान 60-21  असे परतवून लावत बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकले. सुरुवातीपासून झंझावाती खेळ करीत पहिल्या डावातच प्रतिस्पर्ध्यावर 2 लोण देत 28-09 अशी आघाडी घेत विजयाचा पाया रचला. दुसऱया डावात त्याच खेळाची पुनरावृत्ती करीत व अधिक जोमाने खेळ करीत 32 गुणांची कमाई करीत आपला विजय सोपा केला.