राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा – महाराष्ट्राच्या कबड्डी संघांची विजयी सलामी

आंतरराष्ट्रीय खेळाडू शंकर आणि स्नेहल शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कबड्डी संघांनी सोमवारी 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दमदार विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने तमिळनाडू संघाचा 49-25 गुण फरकाने धुव्वा उडवला, तर महिला संघाने हिमाचल प्रदेशवर 32-31 असा निसटता विजय मिळवला.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कबड्डीला सोमवारपासून सुरुवात झाली. सलामीला महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयाचे मानकरी ठरले. यासह नवरात्रीच्या पहिल्याच माळेला महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजय मिळवले. यामध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाचा रोमहर्षक विजय लक्षवेधी ठरला.

सोनाली, स्नेहल, रेखाने मैदान गाजवले

स्नेहल शिंदेच्या कुशल नेतृत्वासह बोनस स्टार सोनाली शिंगटे, रेखा, अंकिता यांनी आपल्या सर्वोत्तम खेळीतून सलामीचा सामना गाजवला. सोनालीने बोनस गुणांसह सुरेच चढाई करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. तसेच पकडीमध्ये अंकिता, रेखाची कामगिरी कौतुकास्पद ठरली. त्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत अटीतटीत असलेला हा सामना महाराष्ट्राला आपल्या नावे करता आला. संघाकडून सर्वोत्तम चढाईसह पकडीही झाल्या. तसेच टीमला बोनस गुणांचीही कमाई करता आली. त्यामुळेच हिमाचल प्रदेश टीमचा विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला. महाराष्ट्राला सोनाली, स्नेहलच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभवाचा मोठा फायदा झाला.