महाराष्ट्राचा माजी राष्ट्रीय विजेता सनील शेट्टीचा विजयासाठी संघर्ष

सुरत, गुजरात येथे खेळवल्या जाणाऱया 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज तब्बल टेनिस प्रकारात महाराष्ट्राचा माजी राष्ट्रीय विजेता आणि तिसरा मानांकित सनील शेट्टी याला दुसऱया फेरीत विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला. उत्तर प्रदेशच्या दिव्यांश श्रीवास्तवने अनुभवी सनीलला विजयासाठी तब्बल 7 सेट्स झुंजवले. अखेर पुरुष एकेरीतील ही चुरशीची झुंज सनीलने 11-5 , 7 -11 , 9-11, 11-8, 11-9, 7 -11, 11 -9 अशी जिंकत तिसऱया फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत अग्रमानांकित जी. सथियन आणि दुसरा मानांकित अचिंता शरथ कमल यांनी आपल्या लढती सहज जिंकून आरामात तिसऱया फेरीत मजल मारली.

  महाराष्ट्राच्या डावखुया सनील शेट्टीला एकेरी लढतीआधी मिश्र दुहेरी उप उपांत्यपूर्व फेरीत गुजरातच्या मानव ठक्कर नि फिलझा काद्री जोडीकडून 7-11, 8-11, 7-11 असा पराभव पत्करावा लागला होता. सनीलच्या जोडीला रिथ रिश्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत होती. एकेरीत मात्र सनील याने पराभव टाळत अखेर विजय मिळवला . अन्य पुरुष एकेरी लढतीत सथियान याने हरयाणाच्या वेस्ले डो रोसारिओ याला 13 -11 , 11-6, 11-4 , 11-5 असे पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर शरथ कमलने महाराष्ट्राच्या रवींद्र कोटियनला 11-9 , 11-6, 11-6 , 17-15 असे पराभूत करीत पुढच्या फेरीत मजल मारली.