काळ्या पैशांबाबत ई-मेलवर ३८ हजार तक्रारी

सामना ऑनलाईन । मुंबई

दडवण्यात आलेल्या काळ्या पैशांबाबत सरकारला लोकांनी ‘खबर’ देण्यासाठी अर्थ मंत्रालयाने सुरू केलेल्या ई-मेल आयडीवर आतापर्यंत ३८ हजार ई-मेल आले आहेत. मात्र त्यापैकी फक्त सहा हजार तक्रारीच चौकशीसाठी पुढे पाठवण्यात आल्या आहेत. ही गोष्ट माहिती अधिकार कायद्याखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नाला मिळालेल्या उत्तरातून बाहेर आली आहे.

अर्थ मंत्रालयाने सुरू केलेल्या ई-मेल आयडीवर किती तक्रारी आल्या आहेत, अशी विचारणा माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी केली होती. त्यावर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसकडून आलेल्या उत्तरातून ही माहिती उघड झाली. या मेलवर ३८,०६८ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी १६ टक्के म्हणजे ६,०५० तक्रारी पुढील चौकशीसाठी आयकर विभागाकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले, तर उर्वरित ३२,०१८ तक्रारी बंद करण्यात आल्या आहेत. आलेल्या ई-मेलमध्ये बिनबुडाच्या किंवा खोट्य़ा किती तक्रारी होत्या, असे घाडगे यांनी विचारले होते. त्यावर अजून चौकशी सुरू असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. फक्त १६ टक्के तक्रारी चौकशीसाठी पुढे पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुमारे ८४ टक्के तक्रारी खोट्य़ा होत्या किंवा अधिकाऱ्यांनी त्या गंभीरतेने घेतल्या नाहीत, असे मत घाडगे यांनी व्यक्त केले.

१ जानेवारी २०१७नंतर रद्द झालेल्या किती नोटा आरबीआयकडे जमा झाल्या, अशी विचारणाही घाडगे यांनी माहिती कायद्या अंतर्गत केली होती. मात्र माहिती अधिकारात काहीही सांगण्यात सेंट्रल बँकेने नकार दिला.