जालन्यात आयकर धाडीत सापडले 390 कोटींचे घबाड,100 अधिकारी वऱ्हाडाच्या गाडय़ांमधून आले!

जालना शहरात आयकर विभागाने 1 ते 8 ऑगस्टदरम्यान धाडी टाकून मोठी कारवाई केली आहे. जालन्यातील स्टील व्यावसायिक, व्यापारी व्यावसायिकांवर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची मोजणी करण्यासाठी नोटा मोजण्याच्या मशीनचा वापर करावा लागला. 12 मशीनच्या सहाय्याने या मोजणीला 14 तास लागले. हे घबाड पाहून आयकर विभागाचे अधिकारीही थक्क झाले.

या धाडीमध्ये तब्बल 58 कोटी रुपये रक्कम आणि 32 किलो सोन्यासह 390 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या तब्बल 100 अधिकाऱयांनी एकत्रित ही कारवाई केली. वऱ्हाडाच्या गाडय़ांमधून येत प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱयांनी ही कारवाई केली. ‘दुल्हन हम ले जाएंगे’ असा मजकूर असलेले स्टिकरही गाडय़ांवर लावण्यात आले होते.

दुसऱया एका व्यावसायिकाच्या घरात अशाच प्रकारे रोख रक्कम आढळून आली. इन्कम टॅक्स विभागाने टाकलेल्या धाडीत जालन्यातील चार मोठय़ा स्टील व्यावसायिकांचा समावेश होता. या व्यावसायिकांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. दरम्यान, संभाजीनगर पथकाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर स्टील व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

जालन्यात 1 ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळय़ा वाहनांमधून जात एकूण पाच पथकांनी स्टील व्यावसायिकांच्या घरावर आणि ऑफिसवर धाड टाकली होती. 1 ऑगस्टला करण्यात आलेल्या या कारवाईबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. 8 ऑगस्टपर्यंत आयकरचे अधिकारी तपास करत होते. एकूण अडीचशेपेक्षा जास्त अधिकारी 120 हून अधिक वाहनांमधून जालन्यात धडकले होते.

कपाटाखाली, बिछान्यांमध्ये सापडली रोकड

आयकर विभागाने टाकलेल्या धाडीमध्ये सुरुवातीला कुठेच रोकड आणि बेनामी रक्कम आढळून आली नव्हती. मात्र, त्यानंतर आयकर विभागाने संबंधित व्यावसायिकांच्या शहराबाहेर असलेल्या फार्महाऊसवरही धाड टाकली, तिथेही तपास केला. या तपासामध्ये कपाटाखाली, बिछान्यांमध्ये रोख रक्कम आढळून आल्याची माहिती समोर आली. अडगळीमधील काही पिशव्यांमध्येसुद्धा रोकड सापडली. मोठय़ा प्रमाणात नोटा आढळून आल्यानंतर आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले होते.