कांदिवलीत बोगस डोस घेतलेल्या 390 जणांना आज पालिकेकडून लस!

कांदिवली येथील बोगस लसीकरण प्रकरणात बनावट डोस घेतलेल्या 390 लाभार्थ्यांना आज पालिकेकडून अधिकृत लस दिली जाणार आहे. कांदिवली पश्चिममध्ये महावीर नगर परिसरातील ऑमिनिटी मार्केट महानगरपालिका लसीकरण केंद्रावर हे लसीकरण आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईतील सर्व 9 बोगस लसीकरण प्रकरणातील फसवणूक झालेल्या सर्व लाभार्थ्यांना अधिकृत लस देण्यासाठी पालिकेकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत 30 मे रोजी लसीकरण करण्यात आले. खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी असल्याची ओळख सांगत काही दलालांनी हे लसीकरण करून घेतले, मात्र लसीकरणाच्या वेळी लाभार्थ्यांना फोटो काढू देण्यात आले नाहीत. लसीकरणानंतर प्रमाणपत्रावर तीन वेगवेगळ्या केंद्रांची नावे आली. शिवाय वेगवेगळी तारीखही नोंदवण्यात आली. शिवाय लस घेतल्यानंतर 390 पैकी बहुतांशी जणांमध्ये लसीकरणानंतर दिसणारी सौम्य लक्षणेही दिसली नाहीत. रहिवाशांकडून 1260 रुपये मात्र शुल्क घेण्यात आले. त्यामुळे घेतलेल्या लसीबाबत लाभार्थ्यांना संशय आला. ही फसवणूक असल्याचे सांगत रहिवाशांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर हे लसीकरण बोगस असल्याचे समोर आले होते. दरम्यान, मुंबईत आढळलेल्या 9 बनावट लस प्रकरणातील आतापर्यंत शोधलेल्या नागरिकांची यादी पोलिसांकडून महानगरपालिकेला प्राप्त झाली आहे. या नागरिकांना योग्यरीत्या अधिकृत लस देण्यासाठी आवश्यक ती सर्व पडताळणी करून कार्यवाही सुरू आहे.

अशी होतेय कार्यवाही

मुंबईतील 9 बोगस लसीकरण प्रकरणात चौकशी केल्यानंतर अनधिकृत आणि अनुचित पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्व गोष्टींची पोलीसांनी सखोल चौकशी केली आहे. पोलीस तपासानुसार ज्या नागरिकांना बनावट लस देण्यात आल्याचा संशय आहे त्या नागरिकांची यादी पोलिसांनी पालिका प्रशासनाकडे सोपविली आहे. कोविन संकेतस्थळावर मोबाईल क्रमांकाच्या आधारे या नागरिकांची माहिती पालिका प्रशासनाकडून तपासण्यात येत आहे. यानुसार आता खरी लस मिळालेल्या नागरिकांना विहित नियमानुसार कालावधी पूर्ण होताच (कोव्हॅक्सिन असल्यास 28 दिवसांनंतर / कोव्हिशिल्ड असल्यास 84 दिवसांनंतर) दुसरा डोस देण्यात येईल. तर ज्यांना बनावट लस देण्यात आली त्यांना योग्य कार्यवाही करून अधिकृत लस देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या