दरोडेखोरचा म्होरक्या गुन्हे शाखेच्या जाळ्यात

24

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील तेलदार शिवारातील वस्तीवर ३ महिन्यापूर्वी दरोडेखोरांनी धुमाकुळ घालून १२ लाख ८४ हजार रुपयाचा ऐवज लंपास केला होता. त्या दरोड्याच्या टोळीतील चार जणांना नाशिक पोलिसांनी अटक केली होती. मात्र टोळीचा म्होरक्या हिमरत चव्हाण नाशिक पोलिसांना गेल्या ३ महिन्यापासून चकमा देत होता. त्यास संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज बुधवारी पहाटे अटक करून सटाणा पोलिसांच्या ताब्यात दिले.

सटाणा तालुक्यातील तेलदार शिवारात राहणाऱ्या सुशिलाबाई केवळ खैरनार या ३० ऑक्टोबर २०१७ रोजी कुटुंबासह झोपल्या असताना दरोडेखोर लोंखडी जाळीचे कुलूप तोडून घरात शिरले आणि दरवाजावर लोंखडी रॉड आणि लाथा मारून दरवाजा उघडला. त्यांनी खैरनार यांना लोंखडी गजाने आणि लाकडी दांड्याने मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर दरोडेखोरांनी जिवे मारण्याची धमकी देत त्याचे हातपाय बांधले. घरातील लोंखडी कपाट, पेटीतील ३० तोळे सोने, रोख ३ लाख रुपये, मोबाईल असा १२ लाख ८४ हजार रुपये किंमतीचा ऐवज बळजबरीने चोरून नेला. खैरनार यांच्या तक्रारीवरून सटाणा पोलीस ठाण्यात १ नोव्हेंबर २०१७ रोजी दरोडेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी तपास करून ४ दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. चौकशी मध्ये या टोळीचा म्होरक्या गंगापूर तालुक्यातील आसेगाव येथील हिमरत मोहनसिंग चव्हाण (५६)असल्याचे टोळीतील अन्य साथीदारांनी सांगितले होते.

संभाजीनगर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या पथकातील उपनिरीक्षक योगेश धोंडे यांना हिमरत चव्हाण हा मुवुंâदवाडी परिसरात आला असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून त्यांनी सापळा रचला बुधवारी पहाटे त्यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने दरोड्याची कबुली दिली असल्याचे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले.

हिमरत चव्हाण याच्यावर संभाजीनगरातील एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात २०१२ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. अन्य गुन्हे आहेत का? याची चौकशी करण्यात येत असल्याचे थोरात यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या