अबब! रुग्णाच्या पोटातून काढला 4 इंच लांब स्टीलचा ग्लास

उत्तरप्रदेशातील जौनपूरचे वरिष्ठ शल्यचिकित्सक लाल बहादूर सिद्धार्थ यांनी एक अनोख्या प्रकारचे ऑपरेशन केले आहे. जौनपूर येथील गोठवा भटौली येथील समरनाथ नावाचे रुग्ण त्याच्या कुटुंबीयांसह डॉक्टरांकडे हर्नियाच्या ऑपरेशनसाठी गेले होते. गेल्या 3-4 दिवसांपासून पोटात तीव्र वेदना होत असून ते काहीच खात नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना सांगितले.

यावेळी डॉक्टरांनी प्रथम रुग्णाची अल्ट्रासाऊंड चाचणी केली. मात्र यातून डॉक्टरांना काहीच स्पष्ट झाले नाही, त्यानंतर एक्स-रे केला, तेव्हा एक्स-रे रिपोर्ट पाहून डॉक्टर अवाक झाले. कारण रुग्णाच्या पोटात डॉक्टरांना काचेसारखे काहीतरी आढळून आले. डॉक्टरांनाही याचे आश्चर्य वाटले. यानंतर डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटाचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशनमध्ये डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून साडेचार इंच लांब आणि अडीच इंच रुंद स्टीलचा ग्लास काढला. हे पाहून डॉक्टर आणि रुग्णालयातील इतर कर्मचारी आश्चर्यचकित झाले.

सुमारे एक तास हे ऑपरेशन चालले. आता रुग्णाला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून, रुग्णाची प्रकृती अद्याप नाजूक आहे. मात्र स्टीलचा ग्लास रुग्णाच्या पोटात नेमका कसा पोहोचला, हे अद्यापही उघड झाले नाही. माझ्या 18 वर्षांच्या सरावातील हे अतिशय आश्चर्यकारक आणि कठीण ऑपरेशन होते, असे डॉक्टर सिद्धार्थ यांनी सांगितले.