बेकायदा बांधकामांना संरक्षण देणाऱया अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱहाड

23

सामना ऑनलाईन,वसई

वसई-विरार महापालिकेच्या चार सहाय्यक आयुक्तांना निलंबित केल्यानंतर पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मोहन संखे, प्रकाश जाधव, गणेश पाटील आणि प्रदीप आवडेकर या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी थेट घरी बसवल्याने इतर अधिकाऱ्यांची साफ तंतरली आहे. त्यातच आयुक्तांनी अन्य प्रभागांतील बेकायदा बांधकामांचा अहवाल मागविल्याचे विश्वसनीय वृत्त असून त्यामुळे आणखी भ्रष्ट सहाय्यक आयुक्त निलंबनाच्या गळाला लागणार आहेत.

वसई-विरार शहरात भूमाफियांनी सरकारी आणि खासगी भूखंड खुलेआम हडप करून त्यावर बेकायदा बांधकामे केली आहेत. बजेटमध्ये घरे मिळतात म्हणून या घरांसाठी आयुष्यभराची पुंजी दिल्यानंतर फसवणूक झालेल्या असंख्य नागरिकांच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. आयुक्त सतीश लोखंडे यांनी याची गंभीर दखल घेऊन बेकायदा बांधकामविरोधी पथक स्थापन केले आणि कारवाईही सुरू केली. मात्र वसई, नालासोपारा पश्चिम, पेल्हार-धानिव आणि बोळिंज भागात बेकायदा बांधकामांवर हातोडा पडणे दूर उलट आणखी अनधिकृत इमारती आणि बांधकामे उभी राहात असल्याचे   निदर्शनास आले. अखेर आयुक्तांनी भूमाफियांना पाठीशी घालणारे ‘अ’ प्रभागचे (बोळिंज) प्रभारी सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये, ‘ई’ प्रभागचे (नालासोपारा पश्चिम) प्रकाश जाधव, ‘एफ’ प्रभागाचे (पेल्हार-धानिव) गणेश पाटील  आणि ‘आय’ प्रभागाचे (वसई) प्रदीप आवडेकर यांना निलंबित केले.

वकिलांच्या पॅनलनंतर सहाय्यक आयुक्त

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांचे १२०० हून अधिक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. हे खटले लढण्याकरिता पालिकेने वकिलांचे पॅनलही नियुक्त केले होते. परंतु या खटल्यांवरील स्थगिती उठविण्यास अपयश आलेल्या वकिलांचे पॅनलच आयुक्तांनी महिनाभरापूर्वी बरखास्त करून टाकले होते. त्यानंतर चार प्रभारी सहाय्यक आयुक्तांना थेट घरी पाठवून पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांची सफाई मोहीम तीव्र करणार असल्याचे आयुक्तांनी दाखवून दिले आहे.

चार प्रभारी सहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्यात आले आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई न करणे, बेजबाबदारपणे वागणे आणि निक्रीयपणे कारभार करणे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांना प्रभारी सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार देऊन महापालिकेचा कारभार सुरळीत केला जाईल- अजीज शेख (उपायुक्त, वसई-विरार महापालिका)

उरलेल्या पाच प्रभागांचीही झाडाझडती

वसई-विरार महापालिका क्षेत्रात बोळिंज (अ), विरार पूर्व (ब), चंदनसार (क), नालासोपारा पूर्व (ड), नालासोपारा पश्चिम (ई), पेल्हार-धानिव (एफ), वालीव (जी), नवघर (एच) आणि वसई (आय) असे एकूण नऊ प्रभाग आहेत. यातील बोळिंज, नालासोपारा पश्चिम, पेल्हार-धानिव आणि वसई या प्रभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर  निलंबनाची कारवाई केल्यानंतर उरलेल्या पाच प्रभागांतील बेकायदा बांधकामांचा अहवालच आयुक्तांनी मागवला आहे. या प्रभागातही बेकायदा बांधकामांचे पीक आल्यामुळे येथील भ्रष्टाचारी मासेही कारवाईच्या गळाला लागतील अशी चर्चा पालिका वर्तुळात आहे.

यामुळेच उगारला कारवाईचा बडगा

  •  आरक्षित भूखंडांवर, नाविकास क्षेत्रात तसेच इतर शासकीय व खासगी भूखंडांवर झालेल्या बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष.
  •  होत असलेली अनधिकृत बांधकामे रोखण्यात अपयश.
  •  बांधकामे तोडण्याचे आदेश देऊनही त्यावर कारवाई नाही.
  •  वरिष्ठांच्या आदेशाकडे सपशेल दुर्लक्ष.
  •  बेकायदा बांधकाम प्रकरणात संशयास्पद व्यवहार.
  •  न्यायप्रविष्ट प्रकरणात न्यायालयाची स्थगिती व तत्सम आदेश उठविण्याबाबत जाणीवपूर्वक चालढकल.
आपली प्रतिक्रिया द्या