
ठाणे येथील व्यापाऱ्याच्या मुलाचे रेणापूर तालुक्यातील सांगवी येथून अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. परंतु 24 तासानंतर त्या मुलास खंडणीची मागणी न करताच सोडून दिलेले होते. तब्बल 70 दिवसानंतर तपास करुन पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना अटक केली आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाला होता, यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली. त्यावर मात करण्यासाठी आपण हा कट रचल्याची कबुली आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी सांगीतले की, ठाणे येथील व्यापारी निळकंठ सावंत यांचा 5 वर्षाचा मुलगा रियांश हा आपल्या आजी-आजोबांसोबत रेणापूर तालूक्यातील सांगवी येथे आला होता. 11 सप्टेंबर 2020 रोजी अज्ञात व्यक्तींनी या मुलाचे अपहरण केले होते. आरोपींनी औसा तालुक्यातील वडजी येथील एका शेतावर मुलासोबत रात्र काढली. दरम्यानच्या काळात मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवण्यात आल्याने पोलिसांनी तत्काळ संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती.
या मुलाच्या अपहरणाची माहिती सोशल मीडियावरही व्हायरल झाली होती. एकीकडे पोलिसांचा तपास आणि दुसरीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेली माहिती यामुळे हे तरुण घाबरले होते. घाबरून अपहरणकर्त्यांनी कोणाशीही संपर्क न साधता 24 तासांनंतर त्या मुलाला लातूर तालुक्यातील चाटा इथे सोडून दिले होते.
ठाणे येथे केरबा उर्फ करण लक्ष्मण मुधाळे याचे किराणा दुकान होते तो. निळकंठ सावंत यांच्याकडून मालाची खरेदी करत होता. लॉकडाऊनमुळे त्याच्या दुकानाचा व्यवसाय ठप्प झाला आणि त्याने मुलाचे अपहरण करण्यासाठी योजना आखली. त्यासाठी त्याला त्याचा भाऊ मारुती लक्ष्मण मुधाळे आणि पुतण्या दिपक राम मुधाळे (रा. काळमाथा ता. औसा) यांनी सहकार्य केले त्याचप्रमाणे सांगवी येथे राहणारा गजानन उर्फ गज्जू लक्ष्मण सावंत हा ठाण्याला केरबा याच्या खोलीतच राहात होता. त्यानेही अपहरणासाठी मदत केली होती. तब्बल 70 दिवसानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने 4 जणांना अटक केली आहे. गुन्ह्यासाठी वापरलेली एक सॅन्ट्रोकार, एक मोटारसायकलही पोलीसांनी जप्त केली आहे.