दिल्लीतील प्रदूषणाने ओलांडली धोक्याची पातळी; 40 टक्के नागरिकांची शहर सोडण्याची इच्छा

451

दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक भागात एअर क्वालिटी इंडेक्सने 1200 आकडा पार केला आहे. शहरातील वाढत्या प्रदूषणाबाबत राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष होत आहे. प्रदूषणामुळे दिल्लीत श्वास घेणेही कठीण झाल्याचे नागरिकांनी सांगितले. दिल्लीतील प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचे सांगत 40 टक्के नागरिकांनी शहर सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

दिल्ली, नोयडा,गुरुग्राम, गाजियाबाद आणि फरीदाबादमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात 17 हजार लोकांना त्यांचे मत विचारण्यात आले. दिल्ली एनसीआरमध्ये गेल्या तीन वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले नसून आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याने 40 टक्के नागरिकांनी शहर सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर 31 टक्के नागरिकांनी एअर प्युरीफायर, मास्क आणि वृक्षलागवड यासारखे उपक्रम राबवून दिल्लीतच राहणार असल्याचे सांगितले. तर शहर सोडल्यावर उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने नाइलाजाने दिल्लीतच राहावे लागणार असल्याचे 13 टक्के नागरिकांनी सांगितले.

गेल्या वर्षी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 35 टक्के नागरिकांनी शहर सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. या वर्षी शहर सोडण्याची इच्छा असलेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. स्वच्छ हवा, पाणी आणि खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आम्ही सरकारला कर देतो. मात्र, सरकार प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याचे सांगत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी श्वासोश्वास, घसा आणि फुफ्फुसांशी संबधित आजार होत असल्याची माहितीही सर्वेक्षणादरम्यान दिली. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या