प्रो कबड्डी- पाचव्या हंगामात लागणार ४००खेळाडूंवर बोली

18

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्रो- कबड्डी लीगच्या (पीबीएल) पाचव्या हंगामात यंदा ४०० कबड्डीपटूंवर १२ संघांचे मालक बोली लावणार आहेत. त्यात स्टार स्पोर्टस्च्या ‘टॅलंट हंट’ योजनेतून निवडलेल्या १३१ युवा कबड्डीपटूंचाही समावेश आहे. पाचव्या प्रो- कबड्डी हंगामात प्रत्येक कबड्डी संघात १८ ते २५ खेळाडू असतील. यंदा १२ संघांत १३० लढती खेळवल्या जाणार आहेत.

यंदाच्या प्रो- कबड्डी हंगामात खेळाडूंसाठी कोणतीही आधारभूत किंमत ठेवली जाणार नाही. कबड्डीपटूंना विकत घेणारे संघच त्यांची किंमत ठरवणार आहेत. या हंगामात प्रत्येक संघ एकच जुन्या खेळाडूला पुन्हा संघात कायम ठेवू शकणार आहे. त्यामुळे यू मुंबाने कर्णधार अनुप कुमार, तेलुगू टायटन्सने कर्णधार राहुल चौधरी, पाटणा पायरेटस्ने प्रदीप नरवाल, दबंग दिल्लीने कर्णधार मेराज शेख, बंगाल वॉरियर्सने द. कोरियाचा चांग कुन ली, पुणेरी पलटणने चढाईपटू दीपक हुड्डा आणि बंगळुरू बुल्सने बचावपटू आशीष कुमार यांना संघात कायम ठेवले आहे. जयपूर पिंक पँथर्सने मात्र कुणालाही कायम ठेवलेले नाही.

संघ मालकांत सचिन तेंडुलकरही
यंदा ४ नवे संघ प्रो-कबड्डीत पदार्पण करणार आहेत. त्यात एन. प्रसाद व ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचा चेन्नई, अदानी उद्योग समूहाचा अहमदाबाद, जीएमआर ग्रुपचा लखनौ आणि जेएसडब्ल्यू उद्योगसमूहाच्या मालकीचा हरयाणा हे चार नवे संघ यंदा प्रो-कबड्डीत पदार्पण करतील. १३ आठवडे चालणाऱया या स्पर्धेत १२ संघ १३० लढतींची मेजवानी कबड्डीशौकिनांना देणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या