नागपूर शहरात उष्माघाताचे ४१ रुग्ण

सामना प्रतिनिधी । पुणे

राज्यात मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत उष्माघाताचे ४१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सर्वाधिक रुग्ण हे नागपूर येथील असून तेथे २९ जणांना उष्माघात झाला आहे. तर बाकीचे रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत. राज्यात उष्माघाताने मृत्यूची नोंद झाली नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

सर्वसाधारणपणे एप्रिल, मे आणि जून या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे मृत्यू येण्याचीही शक्यता असते. राज्यात विदर्भ आणि मराठवाडा येथे उष्माघाताचा प्रादुर्भाव आढळून येतो. ६५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असलेली व्यक्ती, एक वर्षाखालील आणि पाच वर्षांपर्यंतची मुले, गर्भवती महिला, मधुमेह, हृदयविकार, दारूचे व्यसन असलेल्या आणि अतिउष्ण व्यक्तींना उष्माघाताचा सर्वाधिक धोका असतो. उन्हाळ्यात शेतावर आणि इतर मजुरीची कामे फार वेळ करणाऱ्या व्यक्ती, कारखान्यात बॉयलर रूममध्ये काम करणारे, काच कारखान्यात काम करणारे आणि घट्ट कपड्यांचा वापर केल्याने उष्माघात होऊ शकतो. थकवा येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर, डोकेदुखी, पोटऱ्यांमध्ये वेदना, रक्तदाब वाढणे, अस्वस्थता, बेशुद्धावस्था अशी उष्माघाताची लक्षणे आहेत.

उष्माघाताचे आढळलेले रुग्ण
यंदा मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत राज्यात ४१ जणांना उष्माघात झाला. त्यात नागपूर येथे २९, गोंदिया येथे १, यवतमाळ येथे ५, बुलढाणा येथे १, जळगाव येथे १, लातूर येथे ३, कोल्हापूर येथे १ जणांचा समावेश आहे, अशी माहिती राज्य साथरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे यांनी दिली.

उष्माघात टाळण्यासाठी हे उपाय करा
दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात काम करणे टाळावे. भरपूर पाणी पिणे, कोंल्ड्रिंग पिणे टाळावे, त्याऐवजी लिंबू सरबत, ताक, मठ्ठा, लस्सी आदींचे सेवन करावे. सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. उन्हात जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपीचा वापर करावा.

लक्षण आढळल्यास करायचे उपचार
लक्षणे आढळल्यास त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे. तोपर्यंत रुग्णाला वातानुवूâलित खोलीत ठेवावे. खोलीत पंखे, कुलर ठेवावेत. त्याला थंड पाण्याने आंघोळ घालावी. त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात.

आपली प्रतिक्रिया द्या