नागपूरात भाजपमधून ४२ बंडखोरांची हकालपट्टी

35

सामना ऑनलाईन । नागपूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पठडीत वाढलेल्या व संस्कारक्षम झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत बंडखोरी केल्याने भाजपचे शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी आज गुरुवारी ४२ बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली.

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. काही बंडखोरांना शांत करण्यात भाजपच्या नेत्यांना यश आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतल्यानंतरही जवळपास ५० कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला. यात रा. स्व. संघाचे व संघ परिवारातील अनेकांचा समावेश आहे.

गडकरी यांचे वर्गमित्र असलेले व संघ परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्रीपाद रिसालदार यांनी बंडखोरी केली आहे. संघ परिवाराच्या ताब्यात असलेल्या विदर्भ प्रिमिअर हाऊसिंग सोसायटीचे ते संचालकही आहेत. त्यांनाही पक्षातून ६वर्षांसाठी काढून टाकले आहे. भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व संघ परिवारातील विशाखा जोशी यांनाही पक्षातून काढून टाकले आहे. विशेष म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या प्रभागातून विशाखा जोशी यांनी बंडखोरी केली आहे.

याशिवाय दोन नगरसेवकांवर भाजपने कारवाई केली आहे. यात अनिल धावडे व अनिता वानखेडे यांचा समावेश आहे. धावडे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेतली आहे तर अनीता वानखेडे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. या सर्वांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या