चौथी आशियाई खो-खो – हिंदुस्थानी महिलांची जोरदार चढाई 

  

चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनीय लढतीत यजमान हिंदुस्थानच्या महिला संघाने श्रीलंकेचा 55 गुणांनी (68-13) धुव्वा उडवत जोरदार सलामी दिली. तसेच पुरुषांच्या सामन्यात बांगलादेशने कोरियाचा 43-13 असा सहज पराभव केला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयोजन असलेल्या आशियाई स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन पार पडल्यानंतर हिंदुस्थानी महिला संघाने आपणच राणी असल्यासारखा खेळ केला. प्रियांका इंगळे (2.10 मिनिटे संरक्षण व 4 गुण), रंजना (2.20 मि. संरक्षण व 2 गुण), गौरी शिंदे (5 गुण), अपेक्षा सुतार (4 गुण) यांनी सुसाट खेळ करीत श्रीलंकेला आपला खेळ दाखविण्याची संधीच दिली नाही. अत्यंत नीरस झालेल्या सामन्यात हिंदुस्थानच्या वाघिणींनी एखाद्या शेळीची शिकार करावी तसे श्रीलंकन संघाला फाडून काढताना 68-13 असा भव्य विजय नोंदविला. आजपासून सुरू झालेली ही स्पर्धा साखळी आणि नंतर बाद पद्धतीने खेळवली जाणार आहे. पुरुषांमध्ये अ गटात हिंदुस्थान, नेपाळ, इराण, भुतान व ब गटात बांगलादेश, श्रीलंका, इंडोनेशिया, कोरिआ यांचा समावेश आहे. तर महिलांमध्ये अ गटात हिंदुस्थान, श्रीलंका, भुतान, मलेशिया आणि ब गटात बांगलादेश, नेपाळ, कोरिआ, इंडिनेशिया यांचा समावेश आहे. हिंदुस्थानचा पुरुष संघ साखळीत उद्या इराणशी तर परवा नेपाळशी भिडेल तर महिला उद्या मलेशिया तर परवा नेपाळविरुद्ध खेळतील