हिंदुस्थानी संघ दुहेरी जेतेपदासमीप; उपांत्य फेरीत पुरुष श्रीलंकेशी तर महिला बांगलादेशशी भिडणार

खो-खोत हिंदुस्थानचेच राज्य आहे आणि राहणार हे सिद्ध करण्याच्या दिशेने हिंदुस्थानचे दोन्ही संघ वाटचाल करत आहेत. चौथ्या आशियाई खो-खो जेतेपदाच्या लढतीत धडक मारण्यासाठी हिंदुस्थानच्या पुरुष संघाला श्रीलंकेला तर महिला संघाला बांगलादेशला नमवावे लागणार आहे. गुवाहाटीच्या तामूलपूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत यजमान हिंदुस्थानच्या पुरुष संघाने साखळी फेरीत सर्व साखळी सामने जिंकत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. पुरुष संघाने नेपाळबरोबर झालेल्या सामन्यात एक डाव 18 गुणांनी (67-49) विजय मिळवला. हिंदुस्थानकडून कर्णधार अक्षय भांगरे (1.20, 1.10 मिनिटे संरक्षण व 4 गुण), अमोल पाटील (1.10 मिनिटे संरक्षण व 8 गुण), अरुण गुणकी (16 गुण)  यांनी चांगला खेळ केला. नेपाळच्या खेळाडूंनीही चांगला खेळ केला. तत्पूर्वी, सायंकाळी हिंदुस्थानने  इराणला एक डाव 4 गुणांनी (46-42) असे नमवले. अनिकेत पोटे (1.40 मिनिटे संरक्षण व 4 गुण), अरुण गुणकी (8 गुण), मदन (2.10 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी चांगला खेळ केला. महिलांच्या सामन्यांमध्ये श्रीलंकेने भूतानचा एक डाव 47 गुणांनी पराभव केला.