5 ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमीचे लक्ष्य गाठायचे कसे?

481

एकीकडे महागाई, मंदीने देशाला पोखरलेले असताना दुसरीकडे 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे लक्ष्य गाठण्यासाठी सरकार कामाला लागले आहे. बेरोजगारीमुळे प्रचंड संताप व्यक्त होत असून विकासदर घसरल्यावरूनही सरकारवर सातत्याने टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार चांगलेच खडबडून जागे झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी निती आयोग या ठिकाणी 40 हून अधिक अर्थतज्ञांसोबत तब्बल दोन तास चर्चा केली.

अर्थसंकल्पावरील तयारीत मोदींची भूमिका

अर्थव्यवस्थेची सध्याची परिस्थिती, विकासदर वाढवण्यासाठीचे उपाय या महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा करण्यात आली. बैठकीला निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीला गृहमंत्री अमित शहा, रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री पीयूष गोयल, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, या वेळी अर्थसंकल्पावरील तयारीत पंतप्रधानांचीही सक्रिय भूमिका असणार आहे.

विकासदराबाबत चिंता

बैठकीत घसरत्या विकासदराबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. पंतप्रधानांनी गेल्या काही दिवसांत देशातील प्रमुख उद्योजकांसोबत बैठकही घेतली. याशिवाय विविध उद्योगांमधील तज्ञांसोबतही त्यांनी दहा बैठका घेतल्या.

सूचना मागवल्या

1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणाऱया अर्थसंकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी जनतेच्या काय सूचना आहेत, त्यांची काय मानसिकता आहे या गोष्टी त्यांना जाणून घ्यायच्या आहेत.

अर्थ मंत्र्यांची दांडी

अर्थसंकल्पपूर्व बैठकीला अर्थ मंत्री निर्मला सीतारामन अनुपस्थित राहिल्या. त्यांच्या गैरहजेरीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर तिरकस शेरेबाजी करत टीका केली आहे. ‘‘एक सल्ला आहे, पुढच्या बजेट मीटिंगला अर्थ मंत्र्यांना आमंत्रण देण्यावरही विचार व्हावा,’’ असे ट्विट काँग्रेसने करत ‘फाइंडिंग निर्मला’ असा हॅशटॅगही वापरला आहे. पंतप्रधान मोदींच्या या प्री-बजेट मीटिंगमध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल, परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या