दर्डे कोऱ्हाळे येथील 5 शेतकऱ्यांना जमीन कसण्याचा मार्ग खुला

कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरुण येवले यांनी एक शेतकरी म्हणून औदार्य दाखवत स्वत:च्या गट नंबर 170 मधून 5 फूट रुंद व 940 फूट लांब रस्ता स्वखुशीने देण्याचे त्यांनी जाहीर केल्यानंतर तहसीलदार विजय बोरुडे यांनी संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कायदेशीर कारवाई करत हा रस्ता खुला करून दिला. यानंतर अरुण येवले यांनी स्वखर्चाने दगड-माती मुरूम टाकून दीड लाख रुपये खर्चून पक्का रस्ता तयार करून दिला. त्यामुळे पाच शेतकऱ्यांचा जमीन कसण्याचा मार्ग खुला झाला.

तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे येथील गट नंबर 174 मधील तीन खातेदार, गट नंबर 172 मधील एक खातेदार व गट नंबर 173 एक खातेदार अशा पाच शेतकऱ्यांची दहा ते बारा एकर जमीन वेगवेगळ्या अडचणी व जायला रस्ताच नसल्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी नाईलाजाने या जमिनीकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे दोन पिढ्यापासून बागायत जमीन असूनही ही जमीन पडिक होती. त्यामुळे या जमिनीत काटेरी बाभळीचे साम्राज्य पसरले होते.

शेतकरी योगेश आबा शिंदे , बाबू अमृता शिंदे, दामू अमृता शिंदे, बाळासाहेब गंगाधर शिंदे, कृष्णा अशोक शिंदे व चांगदेव गंगाधर शिंदे या पाच शेतकऱ्यांचा गेल्या दोन दशकापासून बागायती असूनही पडिक असलेली जमीन कसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामी अरुण येवले यांचे औदार्य व तहसीलदार विजय बोरुडे यांची शिष्टाई यामुळे हा प्रश्न सुटला. यावेळी अरुण येवले, माजी सरपंच राजेश डुबे, भाऊसाहेब डुबे, अण्णासाहेब कोल्हे, ज्ञानेश्वर देशमुख, कैलास दिघे, प्रदीप येवले, कार्तिक येवले, शुभम येवले, तलाठी गणेश गरकल, तलाठी धनंजय पराड, तलाठी संदीप चाकणे अदीसह शेतकरी उपस्थित होते.

अरुण येवले यांनी औदार्य दाखविल्यामुळे रस्त्याचा वाद न्यायालयात न जाता प्रेमाने मिटल्यामुळे पैसा व वेळ खर्च न होता शेतकऱ्यांना शेती करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याच्या भावना तहसीलदार विजय बोरुडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. रस्ता खुला झाल्यामुळे देर्डे कोऱ्हाळे ग्रामस्थांनी तहसीलदार बोरुडे यांचे आभार मानले.

रस्ता दुरुस्त करण्याची सूचना
यावेळी देर्डे को-हाळे ग्रामस्थांनी समृद्धी महामार्गामुळे खराब झालेल्या रस्त्याचे गाऱ्हाणे मांडले. यावर तहसीलदार विजय बोरुडे यांनी समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना फोन करून गोदावरी कालवा ते शिंदेवाडी रस्त्याचे खडीकरण करण्याच्या सूचना दिल्या तसेच समृद्धीमुळे पाणी साठवणाचा बंधारा नादुरुस्त झाला होता. तोही दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.