संडे झाला पेंग्विन डे, आबालवृद्धांची पाच कि.मी. रांग…

15

प्रतिनिधी । मुंबई

टीव्ही-चित्रात दिसणारे पेंग्विन आता आपल्या मुंबई नगरीत डेरेदाखल झाल्याने ‘पेंग्विन दर्शना’चे मुंबईकरांना अक्षरशः ‘याड’ लागलं आहे. पेंग्विन कक्षाचे उद्घाटन होऊन आठवडा होऊन गेला तरी दिवसेंदिवस पेंग्विन पाहण्यासाठी येणाऱया पर्यटकांची गर्दी मात्र वाढतच आहे. ते कसे चालतात… कसे पोहतात…पंख कसे हलवतात, पाण्यात चपळाईने कसे पोहतात… आणि त्यांचा शिस्तबद्ध सूर पाहण्याचे कुतूहल आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आज रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकरांनी रेकॉर्डब्रेक गर्दी केली. ही गर्दी इतकी प्रचंड होती की हम्बोल्ट पेंग्विन कक्षापासून अगदी राणी बागेच्या प्रवेशद्वारापर्यंत तब्बल पाच किलोमीटरपर्यंत रांग लावली होती.

पेंग्विन पाहण्यासाठी अनेक पर्यटकांनी पहाटेपासूनच पेंग्विन कक्षाबाहेर रांग लावली होती. रविवारी या गर्दीने रेकॉर्डब्रेक करीत तीस हजारांचा टप्पा ओलांडला. सकाळी ९ च्या ठोक्याला हम्बोल्ट पेंग्विन कक्षाचे प्रवेशद्वार उघडले आणि पालकांसह बच्चेकंपनीनेही प्रचंड उत्साहाच्या भरात कक्षात धाव घेतली. ही गर्दी कालांतराने वाढतच होती. दुपारी गर्दी इतकी वाढली की ३ वाजता राणीच्या बागेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करावे लागले. सायंकाळचे ७ वाजले तरीही रांग काही संपत नव्हती. आतमध्ये मैदानात जेवढी रांग लागलेली होती तितक्यांनाच पेंग्विन दर्शनासाठी सोडण्यात आले. त्यामुळे प्रवेशद्वारावर हजारो मुंबईकरांनी नाके मुरडली. ठाणे, पनवेल, कर्जत, कसारा ते अगदी सुरतहूनही अनेकजण पेंग्विन्सना पाहण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. त्यामुळे ज्यांना पेंग्विन दर्शन झाले नाही त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. दुपारी ३ वाजल्यानंतरही भायखळा रेल्वे स्थानकातून चाकरमान्यांचे जथेच्या जथे कुटुंबकबिल्यासह राणीच्या बागेच्या दिशेने जाताना दिसत होते. दरम्यान, अनिरुद्ध बापूंच्या ६० ते ७० जणांच्या पथकाने मुंबईकरांना शिस्तीत दर्शन होण्यासाठी उद्यानातील कर्मचाऱ्यांना मदत केली.

* १८ मार्चपासून पेंग्विन दर्शनाला सुरुवात.

* ३१ मार्चपर्यंत मोफत पेंग्विन दर्शन

* गर्दीवर नियंत्रण राहावे यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ.

* इतर दिवशी १२ ते १५ हजार मुंबईकरांची गर्दी.

हिंदुस्थानात पहिल्यांदाच पेंग्विन प्रत्यक्षात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मुंबईबाहेरूनही मोठय़ा संख्येने नागरिक राणीच्या बागेत धडक देत आहेत. पेंग्विन पाहून भारावलेल्या चेहऱ्याने प्रत्येकजण हम्बोल्ट पेंग्विन कक्षातून बाहेर पडत आहेत. ही गर्दी पुढे आणखी वाढत जाणार आहे.
>> डॉ. संजय त्रिपाठी, वीर जिजामाता उद्यानाचे संचालक

गेल्या आठवडाभरापासून रोज टीव्हीत पेंग्विन पाहतोय. पोहताना आणि पंख हलवताना पेंग्विन पाहून मजा वाटली. पण त्यांना प्रत्यक्षात पाहण्याची तीक्र इच्छा होती. इतक्या लांबून येऊन काहीच उपयोग झाला नाही. पण आम्ही पुन्हा वेळ काढून येणार एवढे नक्की.
– सुनीला किशोर, पनवेल

आम्ही आणि आमच्या मुलांनी पेंग्विन प्रत्यक्षात कधीच पाहिले नाहीत. त्यामुळे आज रविवारची सुट्टी साधून आम्ही कुटुंबासह पेंग्विन बघायला आलो होतो, पण प्रवेशद्वारच बंद झाले. इतका प्रचंड उत्साह पाहून आम्हालाही उद्याच येऊन पेंग्विन पाहण्याची इच्छा झाली आहे.
– अनिल फुजीनीया, अंधेरी

खूप मजा आली. आमच्या मुलांनी पेंग्विन पाहण्याचा आनंद घेतला. आम्ही पहिल्यांदाच पेंग्विन प्रत्यक्षात पाहिले. पुन्हा एकदा पेंग्विन पाहण्यासाठी नक्की येणार.
– मनोज म्हात्रे, ठाणे

सुरतहून शनिवारी रात्रीच्या गाडीनेच खास पेंग्विन पाहण्यासाठी आलो होतो. लवकर येऊन रांग लावल्यामुळे आम्हाला पेंग्विन पाहायला मिळाले. हिंदुस्थानात कुठेच पेंग्विन नाहीत. त्यामुळे मुंबईत येऊन पेंग्विन पाहायचेच असा निर्धार केला होता. खूप मजा आली.
– आशीम निर्बाण, सुरत

गर्दीमुळे पोलिसांची तारांबळ

दुपारी ३ वाजल्यानंतर राणीच्या बागेचे प्रवेशद्वार बंद करण्यात आल्यामुळे प्रवेशद्वारावर जवळपास हजारो मुंबईकरांची गर्दी बराच वेळ रेंगाळली होती. गर्दी वाढतच गेल्याने अखेर प्रवेशद्वाराबाहेर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी थांबलेल्या पोलिसांच्या व्हॅनमधूनच पोलिसांनी मुंबईकरांना दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून पेंग्विन दर्शनासाठी येण्याचे आवाहन केले. त्यामुळे अनेकांनी हिरमुसल्या चेहऱयाने पुन्हा घर गाठले.

आपली प्रतिक्रिया द्या