निषेधाचा ‘सामना’ रंगला, सामनावीर खेळाडूला मिळाले ‘मोदी ब्रँड’चे 5 लिटर अनमोल पेट्रोल

पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच असून देशातील अनेक शहरांमध्ये दरांनी शंभरीही गाठली आहे. या महागाईचा विरोधकांसह सामान्य नागरिकही वेगवेगळ्या पद्धतीने निषेध करताना दिसत आहे. याचाच एक नमुना मध्य प्रदेशमध्ये पाहायला मिळाला. येथे आयोजित एका क्रिकेट स्पर्धेत सामनावीर खेळाडूला चक्क 5 लिटर पेट्रोल देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.

मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे काँग्रेस नेते मनोश शुक्ला यांनी एका क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. रविवारी या स्पर्धेचा अंतिम सामना सनरायझर्स 11 आणि शहीर तारिक 11 संघात रंगला. हा सामना सनरायझर्स 11 ने जिंकला. अंतिम लढतीत चमकदार कामगिरी केल्याबद्दल सनरायझर्स 11 चा खेळाडू सलाउद्दीन अब्बासी याला सामनावीर पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला.

सलाउद्दीन अब्बासी याला पुरस्कार देण्यासाठी मंचावर बोलावले तेव्हा सर्वच हैराण झाले. कारण पुरस्कार म्हणून त्याला चक्क 5 लिटर पेट्रोलचा एक डब्बा देण्यात आला. हा प्रकार पाहून उपस्थितांमध्ये हात्स्यकल्लोळ उडाला. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींचा निषेध करण्यासाठी याहून चांगला पर्याय नसल्याचे क्रीडा स्पर्धेचे आयोजक मनोज शुक्ला म्हणाले.

‘मोदी ब्रँड’चे अनमोल पेट्रोल

पुरस्कार म्हणून देण्यात आलेल्या पेट्रोल डब्ब्यावर मोठ्या अक्षरामध्ये ‘मोदी ब्रँड अनमोल पेट्रोल’ असे लिहिले होते. यापुढे 5 लिटर आणि किंमत 510 रुपये असेही लिहिण्यात आले होते. सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटोही या डब्ब्यावर होता.

फोटो व्हायरल 

दरम्यान, हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढच्या दरवाढीमुळे कंटाळलेले नागरिक हा फोटो शेअर करत असून पोटधरून हसतही आहेत.

दरम्यान, क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही याचा फोटो शेअर केला असून सध्याच्या काळात यापेक्षा अमुल्य पुरस्कार कोणता असू शकत नाही, असे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या