ठाण्यात स्वाइन फ्लू घुसला,१५ पैकी ५ रुग्ण गंभीर

19

सामना ऑनलाईन, ठाणे

मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात स्वाइन फ्लूने एका बालकाचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच आता स्वाइन फ्लू ठाण्यातही घुसला आहे. ठाणे जिह्यात स्वाइन फ्लूच्या तब्बल १५ रुग्णांची नोंद झाली असून त्यातील सहाजण ठाणे शहरातील आहेत. त्यापैकी पाचजणांची प्रकृती गंभीर आहे. शहराला स्वाइनचा विळखा पडू लागल्याने ठाणेकरांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

राज्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले असतानाच आता ठाणे जिह्यात या आजाराने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. ठाणे, कल्याण, भाईंदर इत्यादी ठिकाणी  स्वाइन फ्लूचे एकूण १५ रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केम्पीपाटील यांनी दिली. त्यापैकी ठाण्यातील नौपाडा येथे राहणाऱया संगीता ठाकूर यांचा ९ मार्च रोजी, तर मीरा-भाईंदरमधील पेणकर पाडा येथे राहणाऱ्या कामाक्षी दाबीकर यांचा २४ एप्रिल रोजी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्वाइन फ्लूची सर्वाधिक दहशत ठाणे शहरात असून आतापर्यंत सहा रुग्ण आढळले आहेत. त्यातील पाच रुग्ण वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

सिव्हिल व कळवा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कक्ष

स्वाइन फ्लूच्या उपचारासाठी कळवा रुग्णालय तसेच ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. त्यात व्हेंटिलेटर, मास्क तसेच टॅमी फ्लूच्या गोळय़ा आदी अनेक सुविधा असून तज्ञ डॉक्टर्स लक्ष ठेवून असल्याचे सिव्हिल सर्जन डॉ. केम्पीपाटील यांनी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले.

सर्दीखोकल्याच्या पेशंटवर लक्ष

व्हायरल इन्फेक्शनमुळे स्वाइन फ्लू होत असून सर्दी-खोकला झालेल्या पेशंटला नेहमीचे औषध देण्यात येते. सर्दी-खोकला झालेल्या पेशंटकडे डॉक्टरांचे लक्ष असून दोन दिवसांत बरे वाटले नाही तर त्या पेशंटचे स्क्रिनिंग करून नंतर काही चाचण्या करण्यात येतात. त्यात स्वाइन फ्लूचा संशयास्पद रुग्ण आढळला तर त्याच्यावर त्यादृष्टीने उपचार केले जातात, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

वाढत्या उष्णतेमुळे वातावरणात झपाटय़ाने बदल होत असून सर्दी, खोकला झाला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. केंद्रे यांनी केले आहे. घशाला सूज येणे, खवखव होणे, ताप, गिळताना त्रास, थुंकीतून रक्त येणे, अंग दुखणे ही मुख्य लक्षणे आढळून येतात.

आपली प्रतिक्रिया द्या