बिबट्याला मारून 5 जणांनी मांस खाल्ले; दात, नखे, कातडी विकण्याचा केला प्रयत्न

निष्पाप जीवांशी क्रूरपणे वागत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या घटना गेल्या काही वर्षात वाढीस लागल्या आहेत. गर्भवती हत्तिणीला फटाके भरलेला अननस खाऊ घालत तिच्यासकट पोटातील पिल्लाला ठार मारल्याच्या घटनेचे पडसाद फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात उमटले होते. तसेच हत्तीच्या कानात जळते कापड टाकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच केरळच्या इडुक्कीमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे.

केरळच्या इडुक्की जिल्ह्यात बिबट्याला पकडण्यासाठी पाच जणांना सापळा लावला होता. त्यात 6 वर्षांचा बिबट्या अडकला. त्याला ठार मारून त्यांनी त्याचे मास खाल्ले. त्यानंतर त्याची नखे, कातडी आणि दात विकण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. या प्रकरणी वनविभागाने पाच जणांना अटक केली आहे.

या पाच आरोपींना घराजवळील शेतात बिबट्याला पकडण्यासाठी 100 मीटरवर सापळा लावला होता. त्यात 6 वर्षांचा सुमारे 50 किलो वजनाच्या बिबट्या अडकला. त्यानंतर या आरोपींनी त्याला ठार मारत त्याचे मांस खाल्ले आणि त्याची नखे, दात आणि कातडी विकण्यासाठी ती वेगळी काढून ठेवली.

वनविभागाला याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पावले उचलत या पाच जणांविरोधात कारवाई केली आहे. त्यांना बिबट्याला ठार मारल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विनोद, कुरीकोस, बिनू, कुंजप्पन आणि विन्सेट अशी आरोपींची नावे आहेत. ते इडुक्की जिल्ह्यातील मनकुलमच्या मुनिपारामधील आहेत.

या पाच जणांनी विनोदच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावला होता. त्यात बिबट्या अडकल्याचे समजताच त्यांनी त्याला ठार करून त्याचे मासं शिजवून खाल्ले. विनोदच्या घरातून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 10 किलो मांस जप्त केल्याचे मनकुलमचे रेंज ऑफिसर उधय सूरिया यांनी सांगितले. तसेच त्यांनी बिबट्याची नखे, दात आणि कातडी विकण्याच्या हेतूने वेगळी केली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.

वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार बिबट्याचा अनुसूची 1 मध्ये समावेश आहे. बिबट्याची शिकार केल्यास सात वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. या पाच जणांनी केलेले कृत्य अमानूष असून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या