मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न; पाच जणांना अटक

38
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन, नागपूर

मंत्रालयात सुरू झालेले आत्महत्यांचे लोण आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापर्यंत पोहोचले आहे. नोकरीत रुजू झाल्यानंतर नागपूर महापालिकेने ही भरती प्रक्रियाच रद्द केल्याने बेरोजगार झालेल्या पाच जणांनी आज मुख्यमंत्र्यांचे नागपूरमधील रामगिरी निवासस्थान गाठले. यातील विजय हटवार हा स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच विजयसह या पाचही जणांना पोलिसांनी अटक केली. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा नोकरीत घेण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याने त्यांनी हे पाऊल उचलले.

विजय हटवार, विनायक पेंडके, अशोग देवगडे, मोहम्मद याकूब, दीपक पारोडे हे रामगिरीजवळ पोहोचले. यातील विजय हटवार याने स्वतःवर रॉकेल ओतून घेतले. तिथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी विजयला तत्काळ ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. विजयसह पाचही जणांना स्वतःला पेटवण्याच्या प्रयत्नात असलेल्या विजय पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

१७ जणांनी दिला होता आत्मदहनाचा इशारा

१९९३ साली नागपूर महापालिकेत झालेल्या २५६ जणांच्या भरतीला न्यायालयात आव्हान दिल्याने स्थगिती मिळाली. १९९७ ला उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवली. त्यानंतर २५६ जणांनी साडेचार वर्षांची सेवा केल्यानंतर २००२ साली तत्काली पालिका आयुक्तांनी पुन्हा १०६ कर्मचाऱयांच्या बरखास्तीचे आदेश दिले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी समिती नेमल्यानंतर ८९ कर्मचाऱयांनाच नियुक्तीचे आदेश दिले. उर्वरित कर्मचाऱयांपैकी १७ कर्मचाऱयांनी न्यायालयात दिलेल्या लढय़ानंतर न्यायालयाने तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश दिल्यानंतरही या १७ कर्मचाऱयांना न्याय न मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली. या प्रकरणात स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र त्यानंतरही न्याय न मिळाल्याने या बेरोजगारांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. यातील पाच बेरोजगार आज रामगिरीसमोर पोहोचले.

सरकारी कार्यालयांत खेटा मारल्यानंतरही न्याय न मिळाल्याने मंत्रालयात आतापर्यंत सात जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यातील शेतकरी धर्मा पाटील यांचा विष घेतल्याने मृत्यू झाला तर हर्षल रावते याने स्वतःला मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून झोकून देत आपले जीवन संपवले. या घटनांमुळे सरकार हादरले असतानाच आज मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच आत्महत्येचा प्रयत्न झाला.

आपली प्रतिक्रिया द्या