पालिकेच्या पाच हजार कर्मचार्‍यांसह एक हजार पोलिसांची ‘निसर्गा’शी झुंज

557

मुंबईत बुधवारी दुपारी इतिहासातील सर्वात मोठे निसर्ग वादळ प्रचंड सोसाट्याचा वारा आणि पावसासह धडकल्यानंतर समुद्राला तुफान आले. मुंबईत अनेक ठिकाणी झाडे-घरे कोसळली. मात्र पालिकेचे कर्मचारी मागे हटले नाहीत. पालिकेच्या मदतीला एक हजारांवर पोलिसांचाही ताफाही होता. शिवाय चौपाट्यांवर तैनात असणारे लाइफ गार्ड, अग्निशमन दलाचे प्रशिक्षित रेस्क्यू जवान यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता. या शिवाय धोकादायक ठिकाणच्या हजारो रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार मुंबईत आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी पालिकेची यंत्रणा तैनात ठेवण्यात आली होती. यामध्ये चौपाट्यांवर ९३ लाइफ गार्ड, अग्निशमन दलाचे १५० जवान-अधिकार्‍यांसह तैनात होत. बीएमसीचे कर्मचारी कोसळलेल्या फांद्या-झाडे उचलण्याची कामगिरी वेगाने करत होते. एनडीआरएफच्या नऊ टीम, नौदलाच्या पाच टीमही पालिकेच्या सहकार्यासाठी तैनात आहेत अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. वैद्यकीय सुविधांच्या ठिकाणी जनरेटरही उपलब्ध करून ठेवण्यात आल्यामुळे कोणतीही गैरसोय झाली नसल्याचे काकाणी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या