5 हजार कोटींचा बँक घोटाळा; उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यालयांवर छापे

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रसिद्ध उद्योजक आणि साखर कारखानदार रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज छापे टाकले. गुट्टे यांच्यावर 5 हजार कोटींचा बँक घोटाळा केल्याचा आरोप आहे.

 रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर्स कारखान्याने हार्वेस्ट अ‍ॅण्ड ट्रान्स्पोर्ट या योजनेखाली 2015 साली 600 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज उचलली. ज्यांच्या नावावर कर्ज घेतली, त्या व्यक्तीच अस्तित्वाच नव्हत्या, काही मृत होत्या किंवा ज्या काही व्यक्ती हयात होत्या त्यांना माहीतच नव्हते की, त्यांच्या नावावर कर्ज काढलंय. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीने तपास सुरू केला आहे. गुट्टे यांच्या मुंबई, परभणी आणि नागपूर येथील घर, कार्यालयांवर आज छापे टाकण्यात आले. ईडीने मनी लॉडरिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात असे आढळून आलंय की, गुट्टे यांनी बोगस कंपन्या स्थापन करून बँक घोटाळा केला आहे.

रत्नाकर गुट्टे हे ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाचे दिग्दर्शक विजय गुट्टे यांचे वडील आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. त्यांचा पराभव झाला.