सेव्हन हिल्सने ५० डॉक्टरांचं ६ महिन्यांचं वेतन थकवलं

24

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील सेव्हन हिल्स या प्रसिद्ध रूग्णालयातील ५० डॉक्टरांना मागील सहा महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. अंधेरीतील मरोळ येथे हे रूग्णालय आहे. वेतन न मिळालेल्या डॉक्टरांनी अखेर वैतागून पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. तसेच डॉक्टरांनी वेतन रोखून धरणाऱ्या व्यवस्थापनाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यापासून या डॉक्टरांना वेतन मिळालेले नाही. तसेच राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जात असल्याचं काही डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसेच २८ डिसेंबरपासून डॉक्टर्स हे अनिश्चितकाळासाठी संपावर गेले आहेत. मुख्य डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे ५० ज्युनिअर डॉक्टर्सवर आता रूग्णाची काळजी घेण्यासाठी आरोग्य सेवेची जबाबदारी आहे.

डॉक्टरांनी फक्त इमर्जन्सी वॉर्डमधील रुग्णांना तपासण्याचा निर्णय घेतला आहे. अंधेरीमध्ये सेव्हन हिल्स हे ३०६ बेडचे रूग्णालय आहे. मात्र मागच्या काही काळापासून या रूग्णालयाला आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येत घट झाली असून सध्या केवळ १७ रूग्ण आहेत.

डॉक्टरांनी मागच्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या वेतनासंबंधी व्यवस्थापनासोबत अनेक बैठका झाल्याचं म्हटलं आहे. तसेच प्रत्येकवेळी आम्हाला वेतन तुमच्या बँक खात्यात जमा होईल असं खोटं आश्वासनही देण्यात आले. पण कधीही त्यांनी त्यांचा हा शब्द पाळला नाही. डॉक्टरांनी रुग्णालयाकडून राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केल्यानंतर याविरोधात एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली.

वेतन न देण्याचा फटका हा रूग्णांनाही बसतो याचं वाईट वाटतं मात्र आमच्याकडे याशिवाय दुसरा काही पर्याय नसल्याचं एका डॉक्टरांनी सांगितलं. तसेच आम्हाला सुद्धा कुटुंब आहे. मागील सहा महिन्यांपासून वेतन मिळालं नसल्याने कुटुंब कसं चालवायचं? मागच्या तीन महिन्यांपासून मी माझ्या मुलांच्या शाळेची फि सुद्धा भरु शकलेलो नाही असंही एका वरिष्ठ डॉक्टरनी सांगितलं आहे. तर याबाबत रूग्णालय प्रशासनाला विचारलं असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या