बेस्ट कर्मचार्‍यांना 50 लाखांची विमा सुरक्षा योजना लागू

987
best-bus

राज्य सरकारने कोरोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवा बजावणार्‍या घटकांना 50 लाखांचे विमा सुरक्षाकवच लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एसटी महामंडळ आणि मंबई महानगर पालिकेच्या पाठोपाठ बेस्टच्या सक्रीय कर्मचार्‍यांनाही 50 लाखांची विमा सुरक्षा योजना लागू झाली आहे. कोविड-19 च्या साथीत सक्रीय राहून कर्तव्य बजावणार्‍या बेस्टच्या सेवक वर्ग सदस्यांना पाठबळ देण्यासाठी 50 लाखांचे विमा सुरक्षाकवच लागू करण्यात आले आहे. बेस्ट कामगार सेनेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी यासंदर्भात आग्रही मागणी केली होती.

बेस्टमध्ये आतापर्यंत 375 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 255 कर्मचार्‍यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनाच्या प्रादुभार्वापासून बरे होण्याचा सरासरी दर 63.29 टक्के इतका आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर कामगारांचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला पाठबळ देण्यासाठी 50 लाख रूपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवा बजावताना बेस्ट वाहक, चालक आणि तिकिट तपासणी करणारे निरीक्षक व विद्युत विभागातील कामगार यांना कोरोनाची लागण झाली आहे. मृत कामगाराच्या वारसाला नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. तर दररोज 300 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला असून बेस्टच्या परिवहन व विद्युत विभागात एकूण 36 हजार कामगार आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या