बेस्ट कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा कवच लागू होणार; बेस्ट कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश

1231
best-bus

राज्य सरकारने ‘कोविड योद्ध्यांना’ 50 लाखांची वैयक्तिक विमा सुरक्षा कवच योजना लागू केली आहे. बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांसाठीदेखील ही योजना लागू करण्यात येणार आहे. बेस्ट कामगार सेनेने यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे बेस्ट कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश आले आहे. अत्यावश्यक सेवेसंबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू पावलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने 50 लाख रुपयांची नुकसान भरपाईची घोषणा केली आहे. यात राज्य सरकारने कंत्राटी आणि इतर सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय सार्वजनिक उपक्रमाचे कर्मचारी यात समाविष्ट केले आहेत. त्यामुळे बेस्ट आणि एसटी कामगारांनाही हा कायदा लागू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

एसटी महामंडळाचे एक लाख कर्मचारी आणि बेस्टच्या 42 हजारांहून अधिक कामगारांना हा कायदा लागू होणार आहे. बेस्ट कामगारासंदर्भात शुक्रवारी शासनाच्या अध्यादेशात स्पष्टपणे उल्लेख केला नव्हता. कोविड-19 अत्यावश्यक सेवा घटकांसाठी हा कायदा लागू होत असल्याने आणि बेस्ट अत्यावश्यक सेवा पुरवित असल्याने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना हा कायदा लागू झाल्याचे बेस्टचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी सांगितले. बेस्ट कामगार सेनेने 50 लाख विमा मंजूर करण्यासाठी आग्रह धरला होता. अध्यादेशात स्पष्ट म्हटले नसले तरी अत्यावश्यक सेवा घटकांत बेस्ट मोडत असल्याने हा लाभ मिळणार असल्याचे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी म्हटले आहे.

बेस्टच्या 150 कर्मचाऱ्यांना डिस्चार्ज
मुंबईची अत्यावश्यक यंत्रणा सुरळीत ठेवणारा बेस्ट कामगार कोरोनाशी मुकाबला करत असून शनिवारी 10 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 150 कर्मचारी बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट 55.55 टक्के झाला असल्याचे बेस्टच्या सूत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या