मराठवाड्याला दिलासा, जायकवाडी ५० टक्के भरलं

107

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

मराठवाड्यात यंदा दिलासादायक पाऊस झाला नसला तरी नाशिकमध्ये झालेल्या तुफान पावसाचा फायदा मराठवाड्याला मिळाला आहे. १५ जुलै पासून नाशिक, त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे गोदावरीचे पाणी गंगापूर धरणातून वेळोवेळी सोडण्यात आल्याने जायकवाडी धरण ५० टक्के भरले आहे.

नाशिक भागातील पावसाचे पाणी गोदावरी नदीमार्गे १५ दिवसांपासून जायकवाडीत सातत्याने सोडले जात आहे. त्यामुळे नाथसागर जलाशय अर्धे भरले असून पूर्णक्षमतेने भरण्यासाठी १० फुट पाणीपातळीची गरज आहे. मात्र नाशिक भागात गेल्या आठवड्यापासून पाऊस थांबल्यामुळे सध्या नवीन पाण्याची आवक मंदावली आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या दगडी धरण उपविभागाचे सहाय्यक अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

सध्या धरणात एकूण पाणीसाठा १७९२.७५९ दशलक्ष घनमीटर एवढा असून यापैकी वापरायोग्य ( जिवंत पाणीसाठा ) १०५४.६५३ दशलक्ष घनमीटर आहे. १५ दिवसांपूर्वी जायकवाडीत १७ टक्के वापरायोग्य पाणीसाठा असताना ही टक्केवारी आता ५० पर्यंत पोहोचली आहे.

धरणे काठोकाठ

नाथसागराच्या वरच्या भागातील सर्व २२ धरणे तुडूंब भरली आहेत. वाघाड, भावली, भंडारदरा, निलवंडे, वालदेवी, व वाकी या धरणांनी शंभरी ओलांडली आहे. तर करंजवण , गंगापूर , गौतमी , कश्यपी ही धरणे सरासरी ९० टक्के भरली असल्याची माहिती जायकवाडी धरण नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या