बालभारती रंजक प्रवास

250

<< निमित्त >>  << मेधा पालकर >>

शाळेत पहिले पाऊल टाकणाऱया प्रत्येक विद्यार्थ्याचे बालभारतीशी नाते जुळते आणि ते कायमस्वरूपी राहते. हे नातं जोडणाऱ्या बालभारतीची ५० वर्षांची वाटचाल पूर्ण झाली आहे. 

येरे येरे पावसा तुला देतो पैसा…’, ‘उठा उठा चिऊताई…’ या बडबडगीतांपासून ते अगदी नामवंत साहित्यिकांच्या कवितांची, लेखांची ओळख करून देणाऱ्या बालभारतीने २७ जानेवारीला ५० वर्षांचा प्रवास पूर्ण केला. जून महिन्यात शाळेत पहिलं पाऊल टाकल्यानंतर हातात पडणारे बालभारतीचे पुस्तक ते अलीकडेच माहिती तंत्रज्ञानाशी जुळवून घेत निर्मिती केलेल्या ‘टॉकिंग बुक्स’पर्यंतचा तिचा प्रवासही मोठा रंजक आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ व अभ्यास संशोधन मंडळ म्हणजेच बालभारतीची २७ जानेवारी १९६७ साली पुण्यात स्थापना झाली. राज्याचे मुख्य कार्यालय पुण्यात आणि चार ठिकाणी मंडळाची पाठ्यपुस्तक भांडारे व वितरण केंद्र स्थापन झाली. राज्यातील शैक्षणिक संस्थांनी मंडळाकडे नोंदणी केल्यानंतर क्रमिक पुस्तकांची मागणी केल्यास पुस्तक – विक्रेत्यांप्रमाणेच शैक्षणिक संस्थांना पुस्तकांच्या खरेदी किमतीवर १५ टक्के सवलत दिली जाते. पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीबरोबरच मंडळाने इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्फूर्तिगीतांचे  पुस्तक तयार करून प्रसिद्ध केले. निवडक कविता आणि स्फूर्तिगीतांतील काही गीते निवडून मंडळाने १८ गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्याचे संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी केले होते. बालभारती गीत मंजुषा प्रसिद्ध करून या गीतांची स्वरलिपीही उपलब्ध करून देण्यात आली.

दरवर्षी बालभारती सात कोटींहून अधिक पाठ्यपुस्तकांची निर्मिती करते. भाषेबरोबरच गणित, विज्ञान, समाजशास्त्र सर्व विषयांतील तज्ञांच्या पाठ्यपुस्तक मंडळाने गेली अनेक वर्षे बालभारतीसाठी काम केले आहे. दर्जेदार शालेय पुस्तकांची निर्मिती व्हावी, सर्व विद्यार्थ्यांना माफक दरात पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत या उद्देशाने मंडळाची स्थापना करण्यात आली. गेल्या ५० वर्षांत पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना वाचनीय काही मिळावे यादृष्टीने ‘किशोर’ या मासिकाची निर्मिती बालभारतीकडून करण्यात आली. १९७३ मध्ये किशोरचा पहिला अंक प्रकाशित झाला. दर महिन्याला मासिकाच्या ६५ हजार प्रती छापण्यात येतात, तर दिवाळी अंकाच्या एक लाखापेक्षा जास्त प्रती प्रसिद्ध होतात.

बालभारतीची वाटचाल आता ई-बालभारतीच्या दिशेने सुरू झाली आहे. व्हिडीओ, कवितांच्या चाली सांगणारे ऑडिओ या तंत्राद्वारे हे साहित्य मोबाइलवरून उपलब्ध होणे शक्य झाले. काळानुरूप बदल करणाऱ्या बालभारतीने सध्याच्या व्हॉटस्अॅपच्या जमान्यात शालेय विद्यार्थ्यांना अॅपच्या माध्यमातून पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अॅपच्या जोडीने इयत्ता सहावीच्या पुस्तकामध्ये प्रायोगिक पातळीवर क्यूआर कोड वापरून पुस्तकांमधील मजकूर अधिक संवादी करण्याचे पाऊलही उचलले. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांसाठी क्यूआर कोड, व्हर्च्युअल टेक्स्टबुक ऑगमेन्टेड  रिऑलिटी हे प्रकल्पही तयार करण्यात आले.

दरवर्षी बालभारती पहिली ते आठवीच्या पुस्तकांची छपाई करतेच. यंदा नववीची पुस्तके तयार करून निर्मिती करण्याचे कामही बालभारती करणार आहे. त्यामुळे इयत्ता सातवी आणि नववीची पाठ्यपुस्तकेही आता अॅपद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

नियमित पाठ्यपुस्तकांबरोबरच अल्पदृष्टी विद्यार्थ्यांसाठी ए /५ आकारात पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन अधिक सुलभ होण्यास उपयोग झाला. नव्या अभ्यासक्रमाची टॉकिंग बुक्स तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. दरवर्षी साधारण अडीच कोटी शिक्षणपूरक साहित्य, कार्यपुस्तिकांची निर्मिती करण्यात येते. अभ्यासक्रमावर आधारित ई-साहित्याच्या निर्मितीमध्ये पहिली ते आठवीपर्यंतची पुस्तके आठ भाषांच्या माध्यमातून तयार केली जातात.

शाळेत पहिले पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे बालभारतीशी जुळलेले नाते हे चिरकाल टिकणारे असते. पहिलीत गिरविलेल्या अक्षरांपासून ते नामवंत लेखकांची ओळख हीच बालभारतीची पुस्तके करून देतात. आता सर्व सालातील पुस्तके बालभारतीने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करून दिली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तो बालपणीचा काळ प्रत्येकाला अनुभवता येणार आहे. शिवाय सोशल मीडियामुळे सर्व पुस्तके आता स्वत:च्या मोबाईलवरही वाचणे सोपे झाले आहे.

‘ समाजाच्या गरजा विचारात घेऊन बालभारतीने आपले स्वरूप बदलले. राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमाबरोबरच बालभारतीने महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश करून तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.  इयत्ता सातवी आणि नववीसाठी बालभारतीची पुस्तके मोबाईल ऍपवर उपलब्ध करून देण्याचे काम सुरू झाले आहे. या वर्षी इयत्ता नववीची पुस्तके तयार करून, ती छपाई करण्याचे कामही बालभारतीकडे आहे. यापुढेही बालभारतीची वाटचाल प्रगतीच्या दिशेने आणि काळाशी सुसंगत राहणार आहे.’ – सुनील मगर, बालभारतीचे संचालक

 

आपली प्रतिक्रिया द्या