तामिळनाडूत जमिनीखाली सापडला सोन्याच्या नाण्यांनी भरलेले घंगाळ

6880

उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 160 किलो सोन्याचा खजिना सापडल्याची घटना ताजी असतानाच आता तामिळनाडूत जमिनीखालून सोन्याच्या नाण्यांनी भरलेले घंगाळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. तिरुचीरापल्ली जिल्ह्यातील थिरुवानाईकवाल येथील अखिलांदेश्वरी जांबुकेश्वरार मंदिरात खोदकामाच्या वेळी ही नाणी सापडली आहेत. मंदिर प्रशासनाने ही नाणी पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत.

या मंदिरात नूतनीकरणाचे काम सुरू होते. त्यावेळी मंदिराच्या परिसरात खोदकाम करत असताना कामगारांना एका पितळी घंगाळात सोन्याची नाणी सापडली. याबाबत त्यांनी मंदिर प्रशासनाला कळवले. त्या घंगाळात तब्बल 505 सोन्याची नाणी असून त्याचे वजन 1 किलो 700 ग्राम आहे. या नाण्यांवर अरेबिक भाषेतील शब्द लिहलेले असून ती इ.सन 1000-1200 मधील असावीत अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.या नाण्यांचा बाजारभाव हा 68 लाख रुपये आहे असे समजते. ही नाणी सापडल्यानंतर आता पुरातत्व खात्याने या परिसरात उत्खनन करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सापडला सोन्याचा साठा 

उत्तर प्रदेशातील सोनभद्र या ठिकाणी पर्वतीय प्रदेशांमध्ये हा खजिना सापडला आहे. 2005पासून या प्रदेशांमध्ये जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेतर्फे उत्खननाचं काम सुरू होतं. या उत्खननाच्या वेळी सोनभद्रच्या कोन तालुक्यातील हरदी आणि दुध्धी तालुक्यातील महुली या दोन गावातील डोंगराळ प्रदेशात सोनं सापडलं आहे. सुरुवातीला या भागात तीन हजार टन सोन्याचा साठा असल्याची अफवा उडाली होती. मात्र नंतर तेथे 160 किलो सोनं असल्याचे स्पष्ट झाले.

सोन्याच्या दराला कोरोना व्हायरसने ग्रासले 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला चांगलीच दरवाढ मिळाली आहे. सध्या प्रतिऔंस 1680 डॉलर इतक्या दराने सोनं आंतरराष्ट्रीय बाजारात विकलं जात आहे. हा दर वाढून आता 1700 इतका होऊ शकतो. त्याचा परिणाम हिंदुस्थानातील सोन्याच्या भावावर पडण्याची शक्यता असून तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही दरवाढ आता 45 हजारांवर जाणार आहे. सध्या चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. जेव्हा अनिश्चिततेचं वातावरण तयार होतं, तेव्हा गुंतवणूकदार आर्थिक गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय चोखाळतात. सोनं हा एक खात्रीचा पर्याय असल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे सोन्याचे भाव सतत वाढत आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या