
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 353 व्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, विद्यार्थी विकास विभाग, श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र, प्रा. बाळ आपटे विद्यार्थी आणि युवा चळवळी अभ्यास केंद्र, लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र आणि विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले रायगडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
मुंबई विद्यापीठाकडून सलग तिसऱ्या वर्षी मोठय़ा प्रमाणावर गड किल्ले स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. शिवस्मारक उत्सव समिती किल्ले रायगड आणि सह्याद्री सेवक प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने या स्वच्छता मोहिमेअंतर्गत किल्ले रायगड आणि परिसरातील प्लॅस्टिक संकलन आणि कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेचे 510 स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे 50 कार्यक्रम अधिकारी आणि विद्यापीठातील विविध शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आयोजित केलेल्या किल्ले रायगड स्वच्छ मोहिमेत प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेच्या संचालक प्रा. कविता लघाटे, राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे समन्वयक सुशील शिंदे, जिल्हा समन्वयक डॉ. तुलसीदास मोकळ यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले होते.



























































