पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर पाच वर्षात 517 कोटींचा खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर गेल्या पाच वर्षात 517 कोटींचा खर्च झाला आहे. या पाच वर्षात मोदी यांनी 58 देशांचे दौरे केले आहेत, अशी माहिती सरकारकडून राज्यसभेत देण्यात आली. परदेश राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 सालापासून केलेल्या परदेश दौऱ्यांची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात केलेल्या परदेश दौऱ्यांवर एकूण 517.82 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती मुरलीधरन यांनी दिली. या काळात पंतप्रधान मोदी यांनी पाचवेळा अमेरिका, रशिया आणि चीनचे दौरे केले. तसेच सिंगापूर,जर्मनी, फ्रान्स,श्रीलंका आणि संयुक्त अरब अमीरातचेही दौरे केले आहेत. त्यात एका दौऱ्यात त्यांनी काही देशांना भेटी दिल्या. तर काही दौरे फक्त एका देशासाठीच मर्यादीत होते, असेही मुरलीधरन यांनी सांगितले. पंतप्रधानांनी 13-14 नोव्हेंबर 2019 रोजी ब्रिक्स संमेलनात सहभागी होण्यासाठी ब्राझीलचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी परदेश दौरा केलेला नाही. पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यांमुळे अनेक देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले तर अनेक देशांशी संबंध दृढ झाले, असे मुरलीधरन यांनी सांगितले. तसेच या दौऱ्यांमुळे देशात गुंतवणूक वाढली आणि इतर देशांशी संरक्षण, व्यापार, सहकार्यात वाढ झाली असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या