केंद्र शासनाकडून विदर्भाला ५२ टक्के तर मराठवाड्याला केवळ १२ टक्केच निधी

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

केंद्र शासनाकडून राज्याला मिळणाऱ्या २७ हजार कोटीं रुपयांच्या विशेष पॅकेजमधून विदर्भाला ५२ टक्के तर मराठवाड्याला केवळ १२ टक्केच निधी मिळणार आहे. वेळीच समान निधी वाटपाचे सूत्र न अवलंबविल्यास आगामी काळात मराठवाड्याचा अनुशेष दुपटीने वाढेल, अशी चिंता मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य शंकरराव नागरे यांनी आज व्यक्त केली.

केंद्राकडून मिळणाऱ्या निधीसंदर्भात पूर्वतयारीसाठी आज मराठवाडा विकास मंडळाच्या सभागृहात तज्ज्ञ सदस्यांची बैठक झाली. बैठकीला प्रभारी अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, तज्ज्ञ सदस्य डॉ. अशोक बेलखोडे, डॉ. कृष्णा लव्हेकर, शंकरराव नागरे आदींची उपस्थिती होती. येत्या ४ एप्रिल रोजी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत संपूर्ण राज्याची बैठक होणार आहे. या बैठकीत मराठवाड्यासंदर्भात काय मुद्दे मांडायचे याची प्राथमिक उजळणी या बैठकीत करण्यात आली. त्यात प्रामुख्याने असमान निधी वाटपामुळे मराठवाड्यावर कसा अन्याय होणार आहे ही बाब निदर्शनास आणून देण्याचे ठरले.

मराठवाड्याचा अनुशेष वाढणार
बैठकीनंतर शंकरराव नागरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, केंद्र शासनाने राज्याला २७ हजार २९१ कोटींचे अनुशेष दूर करण्यासाठी विशेष पॅकेज दिले असून, यातील १४ हजार १४६ कोटी (५२ टक्के) विदर्भाला, ९ हजार ९३१ कोटीचा (३६ टक्के) निधी पश्चिम महाराष्ट्राला मिळणार आहे, तर मराठवाड्याच्या हातात केवळ ३ हजार २१४ कोटी (१२ टक्के) पडणार आहेत. या सूत्रानुसार वाटप झाल्यास विदर्भाचा अनुशेष उणे ३ टक्के होईल, आज तो ३ टक्के आहे. तर मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष आज ३.३९ टक्के आहे, तर या निधी वाटपानंतर तो ६.१० टक्यावर जाईल.

पुन्हा विदर्भाचा अनुशेष काढला
सन २०१०-११ मध्ये अनुशेष संपल्याचे तत्कालीन शासनाने जाहीर केले होते. त्यानंतर विदर्भाचा ६९ हजार ८४५ हेक्टर सिंचनाचा अनुशेष निघाल्याचे सांगत शासनाने ६ हजार १४८ कोटी रुपये दिले आहेत. तर आज रोजीपर्यंत १ लाख ८७ हजार हेक्टर सिंचनाचा अनुशेष असून तो संपवण्यासाठी विदर्भाला पुढील २० वर्षात १६ हजार ५२५ कोटी रुपये द्यावे लागतील. तोपर्यंत मराठवाड्याकडे बघायचे देखील नाही का, असा प्रश्नही नागरे यांनी यावेळी उपस्थित केला. वास्तवात मराठवाड्यात सिचनाची ८४ हजार कोटींची कामे प्रलंबित आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या