एचआयव्ही, 53 वर्षे वय असूनही कोरोनाला हरविले! सेंट जॉर्ज रुग्णालयात यशस्वी उपचार

ज्येष्ठ आणि प्रदीर्घ आजार असणार्‍यांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे सांगितले जात असले, तरी सेंट जॉर्ज रुग्णालयात ‘एचआयव्ही’बाधित आणि 53 वर्षे वय असूनही एका रुग्णाने कोरोनाला हरविले आहे. योग्य उपचार, खबरदारी आणि आत्मविश्वासामुळेच संबंधित रुग्ण कोरोनामुक्त होऊ शकल्याचे जे.जे. रुग्णालयाच्या जनरल सर्जरीचे हेड डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले.

कोरोनामुळे मृत होणार्‍यांमध्ये 60 वर्षांवरील आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, किडनी आजार असे आजार असणार्‍यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने अशा रुग्णांना वाचविण्यासाठी विशेष काळजी खबरदारी घ्यावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर आधीच ‘एचआयव्ही’ असलेल्या भेंडीबाजार येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच धक्काच बसला. मात्र, संबंधित रुग्णाला तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी संबंधित रुग्ण कोरोनामुक्त झाला. कोरोनामुक्त झाल्यानंतर जे.जे. रुग्णालयात त्यांची विशेष काळजी घेण्यात आली. त्यांचा क्वारंटाइन काळही पूर्ण झाला असून, त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे जे.जे. रुग्णालयाचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. अमोल वाघ यांनी सांगितले.

हिंमत ठेवा, कोरोना बरा होतो!

‘कोरोना झाल्यामुळे पत्नी आणि तीन मुलांची जबाबदारी असल्याने आपल्या कुटुंबाचे काय होणार? असा प्रश्न मला पडला. मात्र, ज्याप्रमाणे गेल्या 20 वर्षांपासून ‘एचआयव्ही’ असूनही खबरदारी घेऊन आतापर्यंत यशस्वी जीवनप्रवास केला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाला हरविण्याचे ठरविले. सेंट जॉर्ज आणि जे.जे. रुग्णालयांत डॉक्टरांकडून मिळालेला धीर, योग्य औषधोपचार आणि आत्मविश्वास यामुळे कोरोनाला आपण हरवू शकलो,’ असे कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीने सांगितले.  ‘हिंमत ठेवा, कोरोना बरा होतो,’ असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या