रायगड जिल्हा परिषदेच्या 564 शाळांच्या इमारती पडझडीच्या छायेत

4

सामना प्रतिनिधी, अलिबाग

रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पटसंख्या वाढावी यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र एकीकडे शाळांची पटसंख्या कमी होत आहे तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील 564 शाळाच्या इमारती नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना दुरावस्थेचे ग्रहण लागले आहे. शाळांची पटसंख्या वाढवणे गरजेचे असते तरी शाळांच्या इमारती सुस्थितीत करणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे.

खाजगी शाळांच्या इमारती तेथील शिक्षण पद्धत व शाळेतील वातावरण यामुळे खाजगी शाळांची पटसंख्या नेहमी वाढत चालली आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्हा परिषदेच्या 564 शाळाच्या इमारतीची दुरावस्था झाली असून त्या दुरुस्ती करण्यासाठी शाळा प्रशासनाकडून प्रस्ताव जिल्हा परिषद कडे येत आहेत. मात्र कमी निधी अभावी शाळेची दुरुस्ती वर्षोनुवर्षे रखडलेली आहे. दुरावस्था झालेल्या शाळेतील लाद्या निघालेल्या, पावसाळ्यात शाळेत गळती सुरू झालेली आहे. वर्ग खोल्याच्या खिडक्या, दरवाजे तुटलेले आहेत. इमारतीच्या भिंतींना तडा गेलेला आहे. शाळेच्या खोल्यांचे छप्पर उडालेले, स्वच्छतागृहाची अस्वच्छता, शाळेच्या संरक्षक कठडे पडलेले अशी परिस्थिती शाळेच्या इमारतीची झालेली आहे. शाळेच्या इमारतीची झालेल्या या दुरावस्थेत विद्यार्थी शिक्षण घेताना दिसत आहेत.

अलिबाग 24, पेण 61, पनवेल 40, उरण 12, कर्जत 59, खालापूर 43, सुधागड पाली 27, रोहा 77, माणगाव 45, महाड 54, पोलादपूर 20, श्रीवर्धन 36, म्हसळा 31, मुरुड 20, तळा 15, या तालुक्यातील एकूण 564 शाळेच्या इमारती नादुरुस्त झाल्या आहेत. या नादुरुस्त झालेल्या शाळेच्या इमारतीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे आलेला आहे. जिल्हा परिषदकडे शाळा दुरुस्तीसाठी 2 कोटी निधी पूर्वी मिळत होता. तर या निधीमध्ये सर्व शाळाची दुरुस्ती करणे कठीण असल्याने वाढीव निधीसाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव दिला आहे. जिल्हा नियोजन कडून आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र नादुरुस्त शाळांची यादीच अद्याप जिल्हा नियोजन कडे दिली नसल्याने निधी वर्ग करण्यात आलेला नाही.

जिल्हा परिषद शाळांना एकीकडे विद्यार्थ्यांची गळती लागली असून ती थांबविताना शिक्षण विभागाला कठीण जात आहे. त्यातच शाळा इमारतीची झालेली पडझड, दुरावस्था यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचेही तसेच पालकांचे मनोधैर्य खचत चालले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांना खाजगी शाळांच्या तुलनेत स्पर्धेत टिकायचे असेल तर शाळांच्या इमारती व परिसर सुसज्ज ठेवणे गरजेचे आहे. दुरावस्था व पडझड झालेल्या शाळेत शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनाही त्या शाळेची आवड कमी होण्याची भीती निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्हा नियोजन समिती कडून जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी भरीव आठ कोटींचा निधीला जिल्हाधिकारी यांनी मंजूरी दिली आहे. मात्र दुरुस्ती करणाऱ्या शाळांची यादी अजून जिल्हा परिषदेकडून देण्यात आली नसल्याने निधी वर्ग करण्यात आलेला नाही. असे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी सांगितले आहे. जिल्हा नियोजन कडून निधीची तरतूद झालेली आहे. जिल्ह्यातील नादुरुस्त शाळांचा प्रस्ताव मागविला असून शाळांची यादी लवकरच जिल्हा नियोजन कडे पाठविण्यात येणार आहे. ज्या शाळा मोठ्या प्रमाणात नादुरुस्त आहेत. त्या शाळांना प्रथम प्राधान्य देऊन दुरुस्त केल्या जातील. असे शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील यांनी सांगितले.