काशिफ उल उलुम मदरशातील ५७ कॅमेऱ्यांची तोडफोड

फोटो - प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

जामा मशिदीतील मदरशात सीसीटीव्ही कॅमेरे बसविताच काही मौलवींचे पित्त खवळले. या मौलवींनी विद्याथ्र्यांना हाताशी धरून चक्क मदरशातील तीन लाख रुपये किमतीचे ५७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे मदरशाचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात करीत वॉचमनला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

शहरातील बुढीलाईन भागात प्रसिद्ध असलेल्या जामा मशिदीत काशिफ उल उलुम मदरसा हा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मदरशाचे संस्थापक अध्यक्ष मौलाना रियाज फारुकी यांच्या निधनानंतर कमिटीतील वाद उफाळून आला. हाजी जब्बार बागवान यांनी कमिटीची सूत्रे हातात घेतल्यानंतर मदरशात मोठ्या प्रमाणावर घोळ होत असल्याची कुणकुण हाजी जब्बार यांना लागली. मदरसा मॉडर्न आणि हायटेक करण्यासाठी त्यांनी पावले उचलत एकहाती कारभार पद्धतीवर त्यांनी भर दिला.

मदरशात सुधारणा होत असल्याने काही मौलवींचे पित्त खवळले. पित्त खवळलेल्या मौलवींनी विद्यार्थ्यांना उचकून दिले. काही विद्यार्थ्यांनी रागाच्या भरात मदरशातील तीन लाख रुपयांच्या ५७ कॅमेऱ्यांची तोडफोड केली. या घटनेनंतर कमिटी आणि शिक्षकांचे गट समोरासमोर आले. कमिटीचे जब्बार बागवान यांनी माहिती घेतली असता त्यांना एका प्राचार्यानेच विद्याथ्र्यांच्या मदतीने तोडफोड केल्याचे समजल्याने त्यांना धक्काच बसला. त्यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात मदरशात कॅमेऱ्यांची तोडफोड केल्याची तक्रार दिली.

तक्रारीची नोंद करीत पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी तपासाला सुरुवात केली. याबाबत कदम यांनी सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. आज गुरुवारी सिटी चौक पोलीस ठाण्याचे शेख गफार आणि शेख अजीम या दोन कर्मचाऱ्यांनी मदरशातील वॉचमनचा जाब जबाब नोंदवला. यापाठोपाठ प्राचार्य तसेच शिक्षकांचीही चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशातच अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे.

शिक्षक कर्मचाऱ्यांवर लाखोंची उधळपट्टी
दिवंगत संस्थापक अध्यक्ष मौलाना रियाजोद्दीन फारुकी यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलगा मौलाना मोईज फारुकी यांनी या पदावर हक्क सांगत कमिटीशी वाद घातला होता. सध्या वाद पेटलेला आहे. सध्या मदरशात ८०० विद्यार्थी शिक्षण घेतात. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्याने शिक्षक आणि कर्मचारी कमी करावेत, असे आदेश कमिटीने दिले होते. मात्र, हा आदेश प्राचार्यांनी धुडकावला.

मदरशाच्या प्राचार्यावर गंभीर आरोप
प्राचार्य मौलाना मोईज फारुकी हे मदरशात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप करण्यात येत असून त्यांनी हर्सूलमध्ये एका महिलेने दिलेले लाखो रुपयांचे दोन भूखंड, बायजीपुरा येथील घर आणि आटा चक्कीसाठी देण्यात आलेले आठ लाख रुपये परस्पर हडप केल्याची माहिती सिटी चौक पोलिसांच्या तपासात समोर आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या