उत्तर प्रदेशात ५७ तर मणिपूरमध्ये ८४ टक्के मतदान

24

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश विधानसभेच्या सहाव्या टप्प्यात ५७ टक्के मतदान झाले तर ईशान्येकडील मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील ३८ जागांसाठी विक्रमी ८४.४ टक्के मतदानाची नोंद झाली. आता ८ मार्चला उत्तर प्रदेशात शेवटच्या सातव्या टप्प्यासाठी मतदान होणार असून ११ मार्चला निकाल लागणार आहेत.

उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागातील मतदानाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा होता. सपाचे मुलायमसिंग यादव यांचा मतदारसंघ असलेला आजमगड, भाजपनेते योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर यासह बलिया, देवरिया, कुशीनगर, महाराजगंज आणि बाहुबली नेता मुक्तार अन्सारी याच्या मऊ या सात जिल्हय़ांमधील ४९ जागांसाठी मतदान झाले. ५७ टक्के मतदानाची नोंद झाली. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत पूर्वांचलमध्ये सपाला सर्वाधिक २७ जागा मिळाल्या होत्या. बसप ९, भाजप ७, काँग्रेस ४ आणि २ अपक्ष निवडून आले होते.

मणिपूरमध्ये मतदारांचा उत्साह

ईशान्येकडील महत्त्वाचे राज्य असलेल्या मणिपूर विधानसभेच्या ६० जागांपैकी ३८ मतदारसंघांमध्ये आज पहिल्या टप्प्याचे मतदान झाले. मतदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मोठय़ा रांगा होत्या. तब्बल ८४.४ टक्के मतदान झाले आहे. दुसऱया टप्प्यातील २२ जागांसाठी ८ मार्चला मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये २०१२ पासून काँग्रेसची ओकराम इबोबीसिंग हे मुख्यमंत्री आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या