
कोटय़वधी भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे व वेतनातील फरक त्वरित द्यावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत केली. थोरात यांनी त्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
शिर्डी साई संस्थानमधील सुमारे 598 कंत्राटी कर्मचारी साधारणपणे 20 ते 22 वर्षांपासून सेवेत आहे. मागील काळात 1052 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू केले, मात्र 598 कर्मचारी हे त्या नियमांपासून वंचित राहिलेले आहेत. या कर्मचाऱयांनाही सेवेत कायम करण्याबाबत सरकारकडे साई संस्थानकडून वेळोवेळी प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत, असे थोरात यांनी सभागृहाला सांगितले. कायम सेवेतील कर्मचाऱ्यांना 40 हजार रुपये वेतन मिळते तर पंत्राटी कामगारांना 10 हजार रुपयांवर काम करावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे व ऑगस्ट 2009 पासून पूर्वलक्षी प्रभावाने वेतनाचा फरक देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी थोरात यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण, योगेश सागर यांनी भाग घेतला. दरम्यान, शिर्डी साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱयांना सेवेत कायम लवकरच बैठक घेऊ, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.