पेगाँग सरोवराच्या परिसरातून मागे हटण्यास चीनचा नकार; तणाव वाढण्याची शक्यता

3502

पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी हिंदुस्थान आणि चीनमध्ये लष्करी स्तरावरील पाचव्या टप्प्यातील चर्चा सुरू होणार आहे. मात्र, या चर्चेबाबत आणि त्याच्या परिणामाबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. चीनचे राजदूत सून विडाँग यांनी पेगाँग सरोवराबाबत केलेल्या वक्तव्यावरून चीनचा कावा उघड झाला आहे. पेगाँग सरोवराच्या परिसरातून चीन मागे हटणार नसल्याचे विडाँग यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

लष्करी स्तरावर होणाऱ्या चर्चेतून काहीही निष्पन्न होणार नाही, असे चीनचे राजदूत सून विडाँग यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत असल्याचे माजी लष्करप्रुमख वेद मलीक यांनी सांगितले. विडाँग यांच्या वक्तव्यातून चीनचा कावा उघड होत आहे. चीनने या परिसरातून मागे हटण्यास नकार दिल्यास चीनला रोखण्यासाठी हिंदुस्थानला या भागात सैनिकांची गस्त वाढवावी लागेल किंवा चीनी सैनिकांनी हुसकावून लावण्यासाठी युद्धाचा मार्ग स्वीकारावा लागेल, हे दोनच पर्याय हिंदुस्थानसमोर असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. याआधी झालेल्या लष्करी स्तरावरील चर्चेत ठरल्याप्रमाणे गोगरा पेट्रोलिंग पाँइट, 17 आण 17 ए परिसरातूनही चीनी सैन्य मागे हटलेले नाही. तसेच डेपसांगमधील तणावही वाढला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्ल्गार अजित डोभाल आणि चीनचे प्रतिनिधी वांग यी यांच्यात सीमाभागातील तणाव कमी करण्यासाठी लवकरच बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही देशांना युद्ध नको असल्याने या बैठकीतून मार्ग निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पेगाँग सरोवराच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर चीनची पारंपरीक सीमारेषा एलएसीनुसारच आहे. त्यामुळे या भागावर चीनने नव्याने दावा केलेला नाही किंवा या भागाचा ताबा घेतलेला नाही. हा भूभाग चीनचाच असल्याचे चीनचे राजदूत विडाँग यांनी म्हटले आहे. चीन फिंगर पॉइंट 4 सीमा मानत आहे. मात्र,फिंगर 8 पर्यंतचा भाग हिंदुस्थानच्या ताब्यात होता. फिंगर पॉइंट 4 ते 8 या 8 वर्गकिलोमीटरच्या हिंदुस्थानी भूभागावर चीनी सैनिकांनी घुसखोरी केली आहे. पेगाँग सरोवराच्या परिसरातून चीनने मागे हटण्यास नकार दिल्यास दोन्ही देशातील तणावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या