मनपाला दीड कोटी तर नगर पालिकेला ६ कोटी ३५ लाख अनुदान

28

सामना प्रतिनिधी । नागपूर

राज्यातील महानगर पालिका, नगर परिषदा व नगर पंचायतींना शासनातर्फे सर्वसाधारण रस्ता अनुदान देण्यात येते. नागपूर महानगर पालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा आणि पंचायतींना शासनाने एकूण ७ कोटी ८५ लक्ष रुपयांचा निधी दिला असून हा निधी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुपूर्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच एवढा निधी उपराजधानीला उपलब्ध झाला आहे.

या संदर्भातील शासकीय परिपत्रक गेल्या २५ जानेवारी रोजी नगर विकास विभागाने जारी केले आहे. राज्यातील संपूर्ण मनपा आणि नगर परिषदा व पंचायतींना एकूण १४९ कोटी १० लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या प्रकल्पातून करण्यात येणारी रस्त्याची कामे सार्वजनिक स्वरूपाची असतील. यामुळे नागरिकांच्या प्राथमिक सोयी सुविधांमध्ये भर पडणार आहे. सर्व कामे शहर विकास नियंत्रण नियमावली व विकास आराखड्याशी सुसंगत असली पाहिजेत. या कामांसाठी ई निविदा कार्यप्रणालीचाच अवलंब करावा लागणार आहे.

नागपूर महापालिकेला सर्वसाधारण रस्ता अनुदानासाठी दीड कोटी रुपये देण्यात आले असून कामठी, उमरेड, काटोल, वाडी या नगर परिषदांना प्रत्येकी ५० लाख तर रामटेक, खापा, कळमेश्वर, मोवाड, सावनेर, नरखेड, मोहपा, कन्हान पिंपरी व वानाडोंगरी नगर परिषदेला प्रत्येकी ३५ लाख रुपये देण्यात आले आहे. मौदा, महादुला, कुही, हिंगणा, भिवापूर व पारशिवनी या नगरपंचायतींना प्रत्येकी २० लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या