आंध्र प्रदेशात ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात, 6 महिलांचा जागीच मृत्यू

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 44 वर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 6 महिलांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी हा अपघात झाला असून एका ट्रकने रिक्षाला जबरदस्त धडक दिली होती. पामिडी गावाजवळ ही दुर्घटना घडली असून हा अपघात इतका भीषण होता की 5 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एका महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिला शेतमजूर होत्या आणि कोट्टलपल्ली गावात त्या कामाला निघाल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात पहाटे 5.30 च्या सुमारास झाला होता. शेतमजूर महिलांना घेऊन जाणारी रिक्षा ही राँग साईडने येत होती. समोरून येणाऱ्या ट्रकने या रिक्षाला उडवलं ज्यानंतर ट्रकचा ड्रायव्हर तिथून पळून गेला. पोलीस सीसीटीव्ही दृश्ये पाहून ट्रकचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहे. हा अपघात इतका भयंकर होता की रिक्षाचा अशरक्ष: चेंदामेंदा झाला. रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांचे रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत पडलेले होते. अपघातात शंकरम्मा(48 वर्षे), नागवेणी (40 वर्षे) सावित्री (41 वर्षे), सुबम्मा(45 वर्षे) आणि चौडम्मा (35 वर्षे) अशी मृत्यूमुखी पडलेल्या महिलांची नावे आतापर्यंत कळू शकली आहेत. या सगळ्या महिला कोप्पलकोंडा गावच्या रहिवासी होत्या.

राष्ट्रीय महामार्ग 44 वरच घडलेल्या दुसऱ्या एका अपघातात 2 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात येणाऱ्या कारने या दोघांना उडवलं होतं, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याकूब(62 वर्षे) आणि नारायण(60 वर्षे) अशी या दोघांची नावे आहेत. या दुर्घटनांबद्दल आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिश्वभूषण हरीचंदन आणि विरोधीपक्षनेते चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला आहे.