काँग्रेस आमदाराच्या जावयाच्या कारची रिक्षा आणि बाईकला धडक, अपघातात 6 जण ठार

गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील सोजित्रा येथील डाली गावाजवळ कार, ​​ऑटो आणि बाईकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. गुरुवारी संध्याकाळी संध्याकाळी झालेल्या या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. ऑटो रिक्षा आणि मोटारसायकलला कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. गुजरातमधील काँग्रेस आमदार पूनम परमार यांचा जावई केतन पढियार हा निष्काळजीपणे ही कार चालवत होता त्यामुळे काँग्रेस आमदाराच्या या जावयावर हिट अँड रनचा आरोप करण्यात आला आहे.

या गाडीवर गुजरात आमदार असे लिहिले होते. त्यामुळे आता कार चालकावर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. रक्षाबंधनाचा सण साजरा करून कुटुंबीय परतत असताना हा भीषण अपघात झाला.

अपघात घडताच आजूबाजूच्या लोकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मामाच्या घरी राखी बांधण्यासाठी गेलेल्या दोन बहिणी आणि त्यांच्या आईचाही समावेश आहे. या प्रकरणी सोजित्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सदोष मनुष्यवधाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.