पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी 6 जणांना कोरोनाची लागण

पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी कोरोनाचे आणखी 6 रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण पिंपळे सौदागर, चिंचवड, जुनी सांगवी आणि मोशी या भागातील आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागरमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शहरात आता कोरोनाबाधितांची संख्या 56 झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिलेल्या पत्रकानुसार कोरोनाची लागण झालेले शहरात आतापर्यंत 121 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 52 रुग्ण उपचार घेऊन कोरोनावर मात करत घरी परतले आहेत. आतापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 2 रुग्ण हे पिंपरी-चिंचवड शहराचे रहिवासी नाहीत. सध्या शहरात एकूण 56 रुग्ण आहेत. रविवारी शहरातील 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे रुग्ण पिंपळे सौदागर, चिंचवड, जुनी सांगवी आणि मोशी परिसरातील आहेत.

कोरोना रुग्ण आढळल्यामुळे पिंपळे सौदागर आणि चिंचवड, इंदिरानगर परिसराचा काही भाग रविवारी रात्री 11 वाजल्यापासून सील करण्यात येणार आहे. त्यामध्ये पिंपळेसादागर येथील पकवान स्वीट्स, कुणाल आयकॉन रोड, ओम दत्तराज मंदिर, रोजवूड सोसायटी, सोमनाथ स्नॅक्स सेंटर, ओम चैतन्य दूध डेअरी, एमएसईबी ऑफिस परिसराचा, तर चिंचवड, इंदिरानगर येथील महिंद्रा टू व्हीलर शोरूम, सरस्वती को-ऑप-बँक, डबल ट्री हॉटेल, कॉर्पोरेशन बँक, एएसएमएस आयबीएमआर कॉलेज, तेजस एन्टरप्रायजेस, पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क, बीएसएनएल क्वार्टर्स, महिंद्रा टू व्हीलर शोरूम या परिसराचा समावेश आहे. या भागात पुढील आदेशापर्यंत बाहेरच्या व्यक्तीला प्रवेशबंदी आणि आतील व्यक्तीला घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडल्यास तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या