उत्तरप्रदेशातील बहराइचमध्ये बस आणि ट्रकच्या धडकेत 6 जण ठार, 15 प्रवासी जखमी

उत्तरप्रदेशात दाट धुक्यामुळे बहराइच-लखनौ महामार्गावरील घाघरा घाटाजवळ बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. जयपूरहून बहराइचकडे येणारी ईदगाह डेपोच्या रोडवेज बसची आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ट्रक चालकासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा जणांना ट्रॉमा सेंटर लखनौ येथे दाखल करण्यात आले आहे.

जारवाल रोड पोलीस स्थानकाजवळ बहराइच-लखनौ महामार्गावरील घाघरा घाटाजवळ दाट धुके होते. यावेळी ट्रक चुकीच्या दिशेने येत असताना हा भीषण अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. या धडकेत बसच्या मागील व बाजूच्या भागाचे नुकसान झाले. अपघात घडल्यानंतर जखमींनी आरडाओरड सुरु केल्याने आजूबाजूच्या लोकांमध्ये एकाच खळबळ उडाली. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत जखमींना बसमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जारवाल रोड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील उर गावचे रहिवाशी 27 वर्षीय अजित विश्वास, अतुल विश्वास, बोंडीच्या डोकरी येथील 21 वर्षीय विपिन शुक्ला, 21 वर्षीय अरुण शुक्ला मोहित कुमार, 35, रा. विश्वेश्वरगंज या सहा जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. अन्य मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींमध्ये नेपाळमधील 32 वर्षीय दुर्गा, 25 वर्षीय कन्हैया लाल श्रावस्ती, 40 वर्षीय धनीराम नेपाळ, 48 वर्षीय प्रेम नेपाळ आणि 26 वर्षीय ओम प्रकाश बहराइच यांचा समावेश आहे.