अमेरिेकेतील एरिजोनामधील Wells Fargo कंपनीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका 60 वर्षीय डेनिस कर्मचारी महिलेचा मृत्यू झाला. मात्र धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या मृत्यू होऊन चार दिवस उलटले तरी याबाबत कोणालाही खबर नव्हती. मृत्यूच्या चार दिवसांनंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांना महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 16 ऑगस्ट रोजी या महिलेचा कंपनीतच मृत्यू झाला होता. मात्र मृत्यू होऊन चार दिवस उलटले तरी याबाबत कोणालाही माहिती नव्हती. ती महिला चार दिवस मृत अवस्थेत तिच्या केबिनमध्ये होती. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चार दिवसांनंतर 20 ऑगस्ट रोजी एका सुरक्षारक्षकाने या महिलेला तिच्या कॅबिनमध्ये पाहिले. मात्र ती कसलीच हालचाल करत नसल्याने त्याला संशय आला. त्याने लगेचच वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली. यानंतर महिला कर्मचारी डेनिस यांचा मृत्यू झाल्याचे समजले.
डेनिस यांच्या मृत्यूची बातमी कळताच कंपनीत एकच खळबळ उडाली. डेनिसच्या सहकाऱ्यांनी यावेळी दुःख व्यक्त केले. हे खरोखरच हृदयद्रावक आहे. मी विचार करत आहे की मी तिथे बसलेलो असतो तर मला देखील कोणी बघायला आले नसते, असे एका सहकऱ्याने म्हटले. तर दुसरी व्यक्ती म्हणाली, ‘तिने खूप वाईट अवस्थेत आपला जीव गमावला आहे. यावेळी तिच्याजवळ कोणी तरी हवे होते. तर एका सहकाऱ्याने थेट कंपनीवरच प्रश्न उपस्थित केलाय. ‘ही भीतीदायक घटना आहे. नुसता विचार करून माझे मन अस्वस्थ होत आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यायला हवे. हा निव्वळ निष्काळजीपणा आहे, असे ते म्हणाले.
वेल्स फार्गो कंपनीने या घटनेवर एक निवेदन जारी केले आहे. आमच्या कार्यालयातील एका महिलेच्या मृत्यूमुळे आम्हाला सर्वांनाच धक्का बसला आहे. डेनिस यांच्या निधनामुळे त्यांच्या घरच्यांवरही दुःखचा डोंगर कोसळला आहे. या कठीण काळात आमच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयांसह आणि प्रियजनांसोबत आहेत. तसेच सध्या पोलीस डेनिस मृत्यूबाबत चौकशी करत आहेत. त्यांच्या तपासात आम्ही सहकार्य करत आहेत, असे कंपनीने म्हंटले आहे.