सावधान! सर्वाईकल कॅन्सर ठरतोय जीवघेणा, एका वर्षात 60 हजार हिंदुस्थानी महिलांचा मृत्यू

महिलांमधील गर्भाशयाच्या कर्करोगाचे (सर्वाईकल कॅन्सर) प्रमाण जगाच्या तुलनेत चीन आणि हिंदुस्थानमध्ये जास्त आहे. 2018मध्ये 97 हजार चिनी महिलांचा तर हिंदुस्थानमधील 60 हजार महिलांचा मृत्यू झाला. ‘लॅन्सेट ग्लोबल जर्नल’ने जगातील 185 देशांतील आकडेवारी गोळा करून अहवाल प्रसिद्ध केला.

अहवालात जगभरातील 5 लाख 70 हजार महिलांना सर्वाईकल कर्करोग झाला असून त्यापैकी 3 लाख 11 हजार महिलांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. यात शहर आणि गावातील महिलांमध्ये हे प्रमाण वेगवेगळे आहे. शहरी भागात याचे प्रमाण कमी झाले आहे, मात्र ग्रामीण भागात हे प्रमाण कमी झालेले नसले तरी प्रमाण स्थिर आहे. या कर्करोगाबद्दल असलेले अज्ञान हेच महिलांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे याला रोखायचे असेल तर मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे मत आहे.

जागरूकता नसल्यामुळे हिंदुस्थानात मध्यमवयीन महिलांमध्ये सर्वाईकल कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त आहे. वैद्यकीय चाचणीत याचे निदान होऊ शकते. त्यामुळे महिलांनी वेळेत यासाठी चाचणी केली तर महिलांमधील सर्वाईकल कॅन्सरला आळा घालणे शक्य आहे, असे कर्करोगावरील तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

  • सर्वाईकल कॅन्सरने मृत्युमुखी पडणे हे जगभरात महिलांमधील मृत्यूचे चौथे मोठे कारण आहे. पहिले कारण ब्रेस्ट कॅन्सर आहे.
  • दर मिनिटाला एका महिलेला सर्वाईकल कॅन्सर होत असतो असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.
  • याबाबतचे अज्ञान, वेळेवर योग्य ते उपचार न करणे यामुळे हे प्रमाण वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.
आपली प्रतिक्रिया द्या