वधू बनवून 629 पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये विक्री

2217

पाकिस्तानमध्ये मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 2018 पासून ते आतापर्यंत 629 पाकिस्तानी तरुणी आणि महिलांची वधूच्या रुपात चीनमध्ये विक्री करण्यात आली आहे. चीनसोबत घनिष्ठ संबंध असल्याने पाकिस्तानने यावर नरमाईचे धोरण स्वीकारले आहे असा आरोप पाकिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे.

पाकिस्तानी तपास यंत्रणा मानवी तस्करीचे नेटवर्क तोडण्यासाठी काम करत आहेत. मात्र पाकिस्तान सरकारच्या दबावामुळे त्यांच्याही कारवाईवर मर्यादा येत असल्याचं मानवतस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आरोप केला आहे. जर या तस्करांवर कारवाई केली तर चीनसोबत संबंधांवर वाईट परिणाम होईल अशी भीती पाकिस्तान सरकारला वाटते आहे असे बोलले जात आहे.  चीनने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली आहे. त्यामुळे मानवी तस्करात अटक केलेल्या 31 चीनी नागरिकांना सोडून देण्यात आले. अनेक पीडित मुलींनी ऐनवेळी कोर्टात साक्ष फिरवली तर काही मुलींवर दबाव होता तर काहींना पैसे देऊन त्यांना गप्प करण्यात आले असाही आरोप करण्यात आला आहे.

जे अधिकारी मानवी तस्करांवर कारवाई करतात त्यांच्यावर सरकार सूड उगवतं अस आरोप मानवाधिकार कार्यकर्ते सलीम इक्बाल यांनी केला आहे. त्यांच्या बदल्या केल्या जातात, तसेच तक्रार केल्यास पाकिस्तानच्या गृह आणि पराराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी कानाडोळा करतात असं त्यांनी म्हटले आहे.

मानवी तस्करीत पाकिस्तानातील गरीब आणि विशेषतः ख्रिश्चन समाजाच्या मुलींना लक्ष्य केले जाते. त्यांच्या कुटुंबीयांना पैश्यांचे आमिष दाखवले जाते. तसेच मुलीचे लग्न झाल्यानंतर ती अगदी सुखात राहणार अशी थाप मारली जाते. एका मुलीमागे तस्करांना 65 हजार डॉलर रुपये मिळतात म्हणजेच 45 लाख रुपये मिळतात. तस्करी करणारे यातले फक्त 1 लाख रुपये पीडित मुलीच्या पालकांना देतात असा आरोप इक्बाल यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या